Happy Birthday Suniel Shetty | ‘हिरो’च नाही तर ‘व्हिलन’ बनूनही सुनील शेट्टीने गाजवला मोठा पडदा, निर्माता म्हणूनही आजमावले नशीब!
अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जे त्यांच्या खास आणि वेगळ्या अभिनयासाठी ओळखले जातात. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनय करून मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडली आहे.
मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जे त्यांच्या खास आणि वेगळ्या अभिनयासाठी ओळखले जातात. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनय करून मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडली आहे. सुनील शेट्टी याचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी मुल्की, मंगलोर, कर्नाटक येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव वीरप्पा शेट्टी आहे. सुनील शेट्टीने 1992मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बलवान’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
यानंतर, तो ‘वक्त हमारा है’ आणि ‘पहचान’ मध्ये दिसला होता. 1993 च्या ‘दिलवाले’ चित्रपटासाठी सुनील शेट्टीला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला. त्याच वेळी, 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला गती मिळाली. ‘मोहरा’ मधील सुनील शेट्टीचे पात्र प्रेक्षकांना चांगलेच आवडले. यानंतर सुनील शेट्टी ‘गोपी किशन’, ‘टक्कर’, ‘कृष्णा’, ‘सपूत’, ‘बॉर्डर’, ‘भाई’ आणि ‘आक्रोश’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला.
‘खलनायक’ म्हणूनही गाजला!
सुनील शेट्टी चित्रपटांमधील त्याच्या केवळ ‘नायक’ भूमिकांमुळेच नाही तर, त्याच्या विनोदी आणि खलनायकी व्यक्तिरेखांमुळेही खूप गाजला. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटातील त्याचे ‘श्याम’चे पात्र कधीही विसरता येणार नाही, तर ‘धडकन’ चित्रपटातील सुनील शेट्टीची ग्रे शेड भूमिकाही खूप अप्रतिम होती. संजय दत्तचा चित्रपट ‘रुद्राक्ष’ आणि शाहरुख खानचा चित्रपट ‘मैं हूं ना’ मध्येही तो ‘खलनायक’ बनला होता. हिंदी व्यतिरिक्त, सुनील शेट्टीने अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
अभिनेता व्हायचेच नव्हते!
त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुनील शेट्टीला आधी क्रिकेटर व्हायचे होते. ही गोष्ट त्याने आपल्या एका मुलाखतीतही सांगितली होती. याविषयी सांगताना सुनील शेट्टी म्हणाला, ‘मला अभिनयाची अजिबात आवड नव्हती. मला क्रिकेटपटू होण्याची आणि देशासाठी खेळण्याची इच्छा होती. खेळाडूचे शरीर लवचिक असते, म्हणून माझे शरीर लवचिक करण्यासाठी मी मार्शल आर्ट देखील शिकलो. पण मार्शल आर्ट्स अॅक्शन हिरो बनण्यात उपयोगी पडले. मला साजिद नाडियाडवाला आणि राजू मावानी यांच्या चित्रपटात अॅक्शन हिरो म्हणून पहिला ब्रेक मिळाला.’
अभिनेता उत्तम व्यावसायिक देखील!
सुनील शेट्टीने निर्माता म्हणून देखील आपले नशीब आजमावले. त्याने ‘खेल’, ‘रक्त ‘आणि ‘भागम भाग’ सारखे चित्रपट बनवले, पण निर्माता म्हणून त्याची जादू फारशी चालली नाही. सुनील शेट्टी चित्रपटांसह त्याच्या व्यवसायांसाठी देखील ओळखला जातो. त्याच्याकडे अनेक रेस्टॉरंट्स, क्लबची मालकी आहे. रेस्टॉरंट्स सोबतच त्याने लक्झरी फर्निचर, होम डेकोर सारख्या क्षेत्रातही आपला व्यवसाय विस्तारला आहे. यासह, त्याने रिअल इस्टेटमध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो त्याच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमावतो.
हेही वाचा :
‘फिरायला गेलो तरी नमाज चुकवणे नाही…’, सना खानने पतीसोबत विमानतळावरच अदा केली नमाज, व्हिडीओ चर्चेत!