Virat Hotel Room: विराटच्या हॉटेल रूम व्हिडीओवर भडकला हृतिक; म्हणाला ‘त्या व्यक्तीला शोधा अन्..’
हृतिकपासून अभिषेक बच्चनपर्यंत.. सेलिब्रिटींनी विराटच्या हॉटेल रूम व्हिडीओवर व्यक्त केला राग
मुंबई- विराट कोहलीच्या हॉटेल रूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या पोस्टनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्याविरोधात आवाज उठवला. एका अनोळखी व्यक्तीने विराटच्या हॉटेल रूममधील व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर लीक केला. या व्हिडीओत विराटच्या रुममध्ये काय काय आहे, हे स्पष्ट पहायला मिळतंय. हे अत्यंत भयंकर आणि लज्जास्पद असल्याचं विराट आणि अनुष्काने म्हटलंय.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या संतप्त प्रतिक्रिया
‘भयानक वागणूक’ अशी कमेंट वरुण धवनने विराटच्या पोस्टवर केली. तर ‘अत्यंत अनैतिक’ असं अर्जुन कपूरने म्हटलं. ‘अत्यंत खालची पातळी गाठली आहे’, अशा शब्दांत परिणितीने निषेध केला. तर उर्वशी रौतेलानेही पोस्ट लिहित, हीच घटना एखाद्या मुलीच्या बाबतीत घडली असती तर, असा सवाल उपस्थित केला.
रागावलेल्या हृतिकने संबंधित व्यक्तीला कामावरून काढून टाकण्याची मागणी केली. ‘या व्यक्तीला शोधून काढा आणि त्याला कामावरून काढून टाका. संबंधित हॉटेलने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे’, अशी पोस्ट हृतिकने लिहिली.
अनुष्का शर्माची पोस्ट-
‘काही घटना याआधीही अनुभवल्या आहेत, ज्यामध्ये काही चाहत्यांनी कोणतीही दया किंवा विनम्रता दाखवली नाही. परंतु ही खरोखर सर्वांत वाईट गोष्ट आहे. हे एका व्यक्तीच्या खासगी आयुष्याचा अपमान आणि त्याच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. हे पाहून जर कोणी असा विचार करत असेल की सेलिब्रिटी आहे तर या गोष्टींचा सामना करावा लागेल, तर तुम्हीदेखील या समस्येचा एक भाग आहात. काही प्रमाणात आत्मनियंत्रण प्रत्येकाने करावं. तसंच जर हे तुमच्या बेडरुममध्ये होत असेल तर मर्यादेची सीमा कुठे आहे?’, असा सवाल अनुष्काने उपस्थित केला आहे.