“ज्या चित्रपटांमध्ये भारताला वाईट दाखवतात तेच..”; ऑस्कर अकॅडमीबाबत कंगना यांचं परखड मत
भारताकडून ऑस्करसाठी 'लापता लेडीज' हा चित्रपट पाठवण्यात आला होता. मात्र ऑस्करने या चित्रपटाला नाकारलं. त्यानंतर आता कंगना राणौत यांनी त्यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. ज्या चित्रपटांमध्ये भारताला वाईट दाखवलं जातं, तेच ऑस्कर निवडतं.. असं त्यांनी म्हटलंय.
दिग्दर्शिका किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला भारताकडून अत्यंत प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र ऑस्करकडून या चित्रपटाची निवड झाली नाही. यानंतर भारताकडून ऑस्करसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या विषयांवरून देशात चर्चेला सुरुवात झाली. अशातच अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी यावर बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्करसाठी जे चित्रपट निवडले जातात, त्यावरून त्यांनी टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विविध मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखतीत कंगना यांनी ऑस्करबद्दल आपलं मत मांडलंय.
ज्या चित्रपटांमध्ये भारताला वाईट दाखवलं जातं, तेच ऑस्करसाठी निवडले जातात, असं वक्तव्य कंगना यांनी केलंय. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “सहसा भारतासाठी ते जो अजेंडा पुढे आणतात, तो खूप वेगळा असतो. ऑस्कर भारतविरोधी चित्रपटांची निवड करतो. आतासुद्धा एक चित्रपट आहे ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळतंय, मी त्यासाठी खूप उत्सुक होती. मी त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना बोलताना ऐकलं होतं की भारतात धार्मिक असहिष्णुतेमुळे तुम्हाला हवं तसं प्रेम करण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. मी चित्रपट पाहिलासुद्धा नाही. ऑस्करसाठी असा चित्रपट लागतो जो देशाचं वाईट चित्रण करतो. स्लमडॉग मिलेनियर, इत्यादी.. तो नेहमीच असा चित्रपट असावा जो देशाला घाणेरडं दाखवेल.”
“इमर्जन्सी तसा चित्रपट नाही. आज भारत कसा उभा आहे हे पाहण्यासाठी पाश्चिमात्य देश तयार आहेत. मला या पुरस्कारांची कधीच पर्वा नव्हती. मला भारतीय किंवा पाश्चिमात्य पुरस्कारांची अजिबात पर्वा नाही. हा एक असा चित्रपट आहे जो उत्कृष्टपणे बनवला गेला आहे आणि तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपटाइतकाच चांगला आहे. पण मला हेसुद्धा माहित आहे की जियोपॉलिटिक्स (भूराजकारण) कसं काम करतं? आमच्यासारख्या राष्ट्रवादी लोकांना या पुरस्कार सोहळ्यांपासून फारशी आशा नाही”, असं कंगना यांनी स्पष्ट केलं.
कंगना राणौत यांनी दिग्दर्शक केलेला ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबतच चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाक नायर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, सतीश कौशिक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.