सिनेमागृह ते सोशल मीडिया.. चर्चा आहे ती म्हणजे फक्त नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहिलेल्यांना आणि न पाहिलेल्यांनाही अनेक गोष्टींबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. फक्त मराठी कलाकारच नव्हे तर बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शकांनीही या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने ‘झुंड’चं, नागराज यांच्या दिग्दर्शनाचं, कथेचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं समीक्षण केलं आहे. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते किरण माने यांनीसुद्धा नागराज यांच्यासाठी ‘लब्यू भावा’ची पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी नागराज यांचीची एक कविता लिहिली आहे. ‘या कवितेचं महाकाव्य करून तू मोठ्या पडद्यावर मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास’, अशा शब्दांत त्यांनी नागराज यांचं कौतुक केलं आहे.
किरण माने यांची पोस्ट-
‘…नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘तुझ्या येण्याअगोदर एक पत्र’ ही कविता वाचून अस्वस्थ झालोवतो. आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोयस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस…सहजपणे… ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस. लब्यू भावा,’ असं लिहित त्यांनी नागराज यांची ती कविता पोस्ट केली आहे.
नागराज मंजुळेंची कविता या पोस्टमध्ये तुम्ही वाचू शकता:
झुंड या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 6.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या प्रत्येक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना मातीतल्या वास्तव गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत. आता हिंदीत पहिल्यांदाच त्यांनी ‘झुंड‘च्या निमित्ताने रुढ चौकट मोडून काढण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याची पोचपावती अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे दिली. नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.
हेही वाचा:
‘झुंड’ने बॉक्स ऑफिसच्या कमाईची अपेक्षा पूर्ण केली का? नागराज म्हणतात..