Adipurush: ‘आदिपुरुष’चा वाद कोर्टात; ओम राऊतसह संपूर्ण टीमला कायदेशीर नोटीस
"चूक सुधारली नाही तर.."; 'आदिपुरुष' टीमच्या अडचणीत वाढ
मुंबई- ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर नेटकऱ्यांवरून टीका केली जात आहे. राजकीय पक्षांनीही या वादात उडी घेतली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध केला. आता आदिपुरुषचे निर्माते आणि कलाकारांविरोधात कायदेशीर नोटीस (Legal Notice) बजावली गेली आहे. दिग्दर्शक ओम राऊत, टी-सीरिजचे भूषण कुमार, अभिनेता सैफ अली खान, प्रभास आणि कृती सनॉन यांच्याविरोधात ही नोटीस पाठवली गेली आहे. या नोटिशीअंतर्गत दिग्दर्शक आणि कलाकारांविरोधात हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आदिपुरुष या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि कृती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. रामायणातील पात्रांचं इस्लामीकरण करून त्यांना अश्लील भाव देण्यात आल्याचा आरोप या नोटिशीत करण्यात आला आहे. आदिपुरुषचे निर्माते आणि कलाकारांनी हिंदू धर्मग्रंथ रामायणातील मूळ पात्रांच्या सांस्कृतिक मूल्यांशी छेडछाड केल्याचाही त्यात उल्लेख आहे.
वकील आशिष राय यांच्यामार्फत चित्रपटाच्या टीमला ही नोटीस बजावण्यात आली आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “आदिपुरुषच्या निर्मात्यांनी आणि कलाकारांनी भारतीय हिंदू सभ्यतेची ज्याप्रकारे खिल्ली उडवली आहे, ते निषेधार्ह आणि चुकीचं आहे. म्हणूनच चित्रपटाचं प्रमोशन तातडीने थांबवण्यासाठी NCWU ने कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही चूक सुधारली नाही तर निर्माते आणि कलाकारांवर योग्य ती फौजदारी कारवाई केली जाईल.”
या नोटिशीबाबत अद्याप चित्रपटाच्या टीमकडून कोणतीची प्रतिक्रिया आलेली नाही. आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. रामायणावर आधारित या चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.