मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने आज तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो ट्विट केलाय. या ट्विटमध्ये ती एका व्यक्तीसोबत वडापाव खाताना दिसत आहे. खरंतर त्या फोटोतील प्रत्येक गोष्ट प्रसिद्ध आणि मौल्यवान आहे. या फोटोतली माधुरी दीक्षित आणि तिच्यासोबत असणारी दिग्गज व्यक्ती आणि त्यांच्यासोबत असणारा मुंबईचा प्रसिद्ध वडापाव या तीनही गोष्टी खास आहेत. त्यामुळे या फोटोची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. माधुरीसोबत फोटोतली व्यक्ती नेमकी कोण आहे? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. पण ती व्यक्ती कोण आहे हे समजल्यावर अनेकांचे डोळे विस्फारतील. कारण ती व्यक्तीच तितकी मोठी आहे.
माधुरी दीक्षित हिच्यासोबत वडापावचा आस्वाद घेणारी व्यक्ती हे अॅप्पल कंपनीचे सीईओ टिम कुक आहेत. माधुरी दीक्षितकडून कुक यांना वडापावच्या ट्रीटने मुंबईत स्वागत करण्यात आलंय. या ट्रीटने टिम कुक खूप सुखावले आहेत. तसेच माधुरी दीक्षितलाही आनंद झाला आहे. दोघांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजवर चाहत्यांकडूनही वेगवेळ्या कमेंट्स केल्या जात आहेत.
विशेष म्हणजे माधुरी दीक्षित आणि टिम कुक दोघांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एकत्र वडापाव खातानाचे फोटो ट्विट केले आहेत. “मला माझा पहिल्या वाडापावची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. वडापाव खरंच खूप चविष्ट होता”, असं कुक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. दुसरीकडे माधुरी दीक्षित हिने “मुंबईत वडा पाव खाऊ घालून स्वागत करण्यासारखं दुसरं स्वागत होऊच शकत नाही”, असं म्हटलं आहे.
Thanks @madhuridixit for introducing me to my very first Vada Pav — it was delicious! https://t.co/Th40jqAEGa
— Tim Cook (@tim_cook) April 17, 2023
आयफोनचे निर्माते आणि अॅप्पल कंपनीचे सीईओ टिम कुक सध्या भारतात आले आहेत. भारतात अॅप्पल कंपनीचं पहिलं अॅप्पल स्टोअर सुरु होत आहे. या अॅप्पल स्टोअरच्या उद्धाटनाच्या निमित्ताने टिम कुक सध्या भारतात आले आहेत. विशेष म्हणजे आपल्या भारत दौऱ्याच्या पहिल्याच दिशी टिम कुक यांनी भारताचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय त्यांनी भारतातील दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत मुंबईच्या प्रसिद्ध वडापावचा आस्वाद घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. या व्हिडीओत टिम कुक हे मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया बंगल्यात असल्याचं समजतं. या व्हिडीओत आकाश अंबानी आणि ईशा अंबानी टिम कुकच्या सोबत गेटवर जाताना दिसत आहेत. त्यामुळे ते एंटीलियात असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
टिम कुक यांच्या हस्ते उद्या मुंबईत भारतातील सर्वात पहिलं अॅप्पल कंपनीचं स्टोर लॉन्च होणार आहे. मुंबईच्या बीकेसी येथे हे स्टोअर सुरु होत आहे. या स्टोअरला अॅप्पल बीकेसी नावाने ओळखलं जाईल. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिलीय. तसेच त्यांनी स्टोअरमधील कर्मचाऱ्यांसोबतचा फोटोही ट्विट केलाय.