“देवाने मला यश दिलं, पण..”; भाग्यश्रीला आजही सतावते ही खंत
भाग्यश्रीचं नाव घेतलं की 'मैने प्यार किया' (Maine Pyar Kiya) या चित्रपटाचं नाव आपसूकच समोर येतं.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला यश मिळतंच असं नाही. अनेकांच्या पदरी अपयश येतं, तर काहींना अगदी पहिल्याच चित्रपटातून जबरदस्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. पण मिळालेलं हे यशसुद्धा प्रत्येकाला टिकवता येत नाही. बॉलिवूडमधल्या अशाच काही कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree). भाग्यश्रीचं नाव घेतलं की ‘मैने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) या चित्रपटाचं नाव आपसूकच समोर येतं. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या भाग्यश्रीच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाला प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने सलमान खानसोबत (Salman Khan) भूमिका साकारली होती. मात्र नंतर तिने लग्न आणि कुटुंबीयांना प्राधान्य देत बॉलिवूडमधील करिअरला रामराम केला. या निर्णयाचा पश्चात्ताप होत असल्याची खंत भाग्यश्रीने एका मुलाखतीत व्यक्त केली होती. देवाने मला यश दिलं, पण त्या यशाची किंमत मी केली नाही, असं भाग्यश्री म्हणाली. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात काम करतानाच अभिनयाची आवड निर्माण झाल्याचं भाग्यश्रीने सांगितलं. मात्र मिळालेल्या संधीचा मी योग्य वापर केला नाही आणि त्याला फारसं महत्त्व दिलं नाही, असं ती पुढे म्हणाली.
काय म्हणाली भाग्यश्री? “मला त्यावेळी मिळालेलं यश मिळवण्यासाठी अनेक कलाकार जिवापाड मेहनत करतात. मला ते यश खूप सहजरित्या मिळालं आणि तेसुद्धा खूप लवकर मिळालं. जणू ते यश मला मिळणारच होतं, असं वाटलं. देवाने मला यश, प्रसिद्धी, लोकप्रियता दिली, पण मी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकले नाही, त्याचं महत्त्व जाणू शकले नाही. घडलेल्या सर्व घटनांना आता मी एक शिकवण म्हणून पाहते,” असं ती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
View this post on Instagram
आता भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. झी५ ची सीरिज ‘मिथ्या’मधून अवंतिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाग्यश्रीने १९९० मध्ये हिमालय दासानीशी लग्न केलं. या दोघांना अभिमन्यू हा मुलगा आणि अवंतिका ही मुलगी आहे. अभिमन्यूने २०१९ मध्ये ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.