‘मेडल जिंकलं तर भारतीय, अन्यथा चिंकी-चायनीज-नेपाळी-कोरोना म्हणून ओळखतात’, मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली!
अंकिताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने ईशान्येतील लोकांशी भेदभाव करणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला आहे.
मुंबई : मीराबाई चानूने (Saikhom Mirabai Chanu) ‘टोकियो ऑलिम्पिक 2020’मध्ये (Tokyo Olympic 2020) रौप्य पदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावली आहे. ईशान्य भारताच्या म्हणजेच मूळच्या मणिपूरच्या मीराबाईंच्या या विजयाबद्दल देशातील प्रत्येकाला अभिमान वाटतो. सध्या सोशल मीडियापासून ते प्रत्येक वृत्तपत्र आणि प्रत्येक घरापर्यंत तिच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या सेलिब्रेशन दरम्यान, ईशान्य भारतातील लोकांसाठी काही लोकांच्या मनात दडलेल्या जातीवादाच्या भावनाकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. मिलिंद सोमण (Milind Soman) यांची पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) यांनी आता या विषयावर आवाज उठवला आहे.
अंकिताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने ईशान्येतील लोकांशी भेदभाव करणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला आहे. अंकिताने लिहिले की, ‘तुम्ही ईशान्य भारतातील असाल तर देशासाठी पदक जिंकल्यासच तुम्ही भारतीय होऊ शकता. अन्यथा तुम्हाला चिंकी, चीनी, नेपाळी किंवा आता कोरोनाची नवीन आवृत्ती म्हणून ओळखले जाते. भारतात अनेक लोक जातीवादाने त्रस्त आहेत. हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. # हायपोक्रिट्स’
पाहा अंकिताची पोस्ट :
View this post on Instagram
अंकिताच्या मुद्यावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
अंकिताच्या या पोस्टवर बर्याच जणांनी सहमती दर्शवली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘हे खूप निराशाजनक आहे, भिन्न संस्कृती असूनही आपल्यात मानवतेची मूलभूत भावना कमी आहे.’ दुसर्याने लिहिले की, ‘हे अगदी खरे आहे, मला माहित आहे की अशा लोकांना आपलेच लोक बुली करतात आणि दुसरीकडे ब्लॅक लाईव्हसाठी संघर्ष करतात. हायपोक्रेसीला देखील काही मर्यादा आहेत.’ दुसर्याने लिहिले, ‘माझा देखील एक वर्गमित्र मणिपूरचा होता, भारतातील लोक त्याला कधीच भारतीय मानत नव्हते. मी ते अनुभवले आहे. हे एक खुले आव्हान आहे, ज्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. हे कटू सत्य आहे.
गुवाहाटीची मूळ रहिवासी असणारी अंकिता ही एकमेव नाही, जी या जातीवादाची व्यथा सांगत आहे. अॅक्सोन आणि ‘मेरी कोम’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत झळकलेली मॉडेल-अभिनेत्री लिन लैशराम यांनीही यावर भाष्य केले होते.
‘या’ अभिनेत्रीनेही उठवला आवाज
मणिपूरमध्ये राहणारी अभिनेत्री लिन लैशराम म्हणाली की 2014मध्ये एका चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान भेदभाव करण्यात आला होता. एका मुलाखतीत लिन यांनी म्हटले होते की, ‘प्रियांकाने चित्रपटात खूप परिश्रम घेतले आहेत. परंतु, जर ईशान्येकडील किंवा मणिपुरी मुलीची निवड केली गेली असती, तर ती आमचे प्रतिनिधित्व करू शकली असती.’ लिन म्हणाली की, ‘जेव्हा ईशान्येकडील एखाद्या भूमिकेची भूमिका साकारण्याची वेळ येते तेव्हा ईशान्येकडील नसलेल्या व्यक्तीची निवड केली जाते, जसे ‘मेरी-कॉम’मध्ये घडले. तर दुसरीकडे, सामान्य भारतीयांप्रमाणे बॉलिवूड चित्रपटात ईशान्येकडील लोकांना घेतले जात नाही.’
(Milind Soman’s Wife Ankita Konwar calls out racism against people from the northeast indian)