प्रिय ओम राऊत… रावण हा ब्राह्मण होता, ‘आदिपुरुष” चित्रपटातील काही गोष्टी… कुणी लिहिलं ओपन लेटर
आदिपुरुष सिनेमावरून सध्या बराच वाद सुरू आहे. या सिनेमातील संवादापासून ते वेशभूषेवर टीका होत असतानाच आता या वादात एका नेत्याने उडी घेतली आहे.

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमावरून वादंग निर्माण झालं आहे. या सिनेमातील संवाद, व्यक्तीरेखा आणि वेशभूषेवरही सडकून टीका झाली आहे. राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनीच या सिनेमाला विरोध केलेला नाहीये. तर प्रेक्षकांच्या पसंतीलाही हा सिनेमा उतरलेला नाहीये. प्रेक्षकांनीही या सिनेमावर नाराजी वर्तवली आहे. आता या वादात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उडी घेतली आहे. प्रताप सरनाईक यांनी ओम राऊतला ओपन लेटर लिहिलं आहे. या पत्रातून सरनाईक यांनी ओम राऊतचं सिनेमातील खटकणाऱ्या बाबींकडे लक्ष वेधलं आहे.
प्रताप सरनाईक यांचं पत्र जसंच्या तसं…
प्रिय,
ओम राऊत दिग्दर्शक
विषय:- “आदिपुरुष” चित्रपटा संदर्भात जाणवलेल्या काही गोष्टी
प्रिय ओम, तू अत्यंत प्रतिभाशाली मराठी युवा दिग्दर्शक आहेस. लोकमान्य, सिटी ऑफ ड्रीम्स इत्यादीं सारखे चित्रपट बनवलेस आणि मराठी प्रेक्षकांनी ते डोक्यावर उचलून धरले. त्यानंतर तू हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेस. तान्हाजी सारखा इतका जबरदस्त चित्रपट तू बनवलास. त्याने अनेक रेकॉर्ड देखील तोडलेस. एक मराठी चित्रपटांचा चाहता आणि एक निर्माता म्हणून मला नक्कीच तुझा अभिमान आहे.
“आदिपुरुष” हा प्रभू श्री रामचंद्रावर आणि रामायणाचा विषय घेऊन चित्रपट येतोय याची आतुरता होती. त्यात ओम राऊत दिग्दर्शक आहे म्हटल्यावर अपेक्षा आणि उत्सुकता खूप वाढली होती. परंतु “आदिपुरुष” मध्ये तुझ्या दिगदर्शनाला कोणाचीतरी नजर लागल्यासारखी वाटली. “रामायण” आणि प्रभू श्री राम हे या संस्कृतीचे अंतरूप आहे आणि सर्वांना त्यांचे व्यक्तिमत्त्व अथवा वर्णनीय रूप हे डोळ्यासमोर आहे.
परंतु ‘आदिपुरुष” चित्रपटात काही गोष्टी खटकल्यात. उदा:- प्रभास हा खूप मोठा आणि दिग्गज अभिनेता आहे. परंतु श्री रामाच्या भूमिकेत प्रवेश करतांना त्यातला बाहुबली सतत जाणवत होता. अर्थात कोणाला कुठला रोल असावा हा सर्वस्वी लूक टेस्ट केल्यानंतर निर्णय घेतला जातो आणि तो सिनेमॅटिक लिबर्टीचा भाग आहे. परंतु अजून देखील काही गोष्टी जसे की त्याचे संवाद हे त्या संस्कृतीला छेद देणारे आहेत.
एक सीन आहे त्यात रावण वटवाघळाला मांस खायला घालतोय, काहीही असले तरी रावण हा ब्राम्हण होता तो असे मास खायला घालेल हे खरं वाटत नाही. त्याशिवाय तो रावण कमी आणि खिलजी जास्त वाटतोय. काही काही ठिकाणी Vfx खूप वाईट पद्धतीने करण्यात आलाय. वानरसेना असो अथवा राक्षस ते बऱ्याच ठिकाणी ऍनिमेटड असल्याचा भास होतो. अश्या असंख्य गोष्टी आहेत ज्या खटकतात.
आमच्या लहानपणी रामानंद सागर यांची “रामायण” मालिका लागायची. तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. मालिका लागली की रस्त्यावर माणसं दिसायची नाहीत, इतकी लोकप्रियतेच्या शिखरावर ती मालिका होती. त्यावेळेस प्रत्येकाच्या घरी टीव्ही असायचेच अश्यातला देखील भाग नाही, तरीदेखील ज्याच्या घरी असायचे त्याच्या घरी सगळे जमा होऊन “रामायण” पाहायचे.
त्यातल्या प्रत्येक भूमिका आजही स्मरणात आहेत, त्यात ते पावित्र्य होते. मी असे म्हणणार नाही की, तू त्यावेळची कॉपी बनवली पाहिजे होती म्हणून. निर्माता या नात्याने मला देखील माहीत आहे की, काळ बदललाय, टेक्नॉलॉजी बदलली आहे, सिनेमॅटिक लिबर्टी सर्व मान्य आहे. पण कितीही काही असले तरी हा आस्थेचा विषय आहे, त्यात जास्त छेडछाड करणे योग्य नाही. त्याचे पावित्र्य हे अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.
मला पूर्ण कल्पना आहे की, ज्या चुका त्यात झाल्या त्या तू जाणूनबुजून बिलकुल करणार नाहीस. तू त्याला एका वेगळ्या स्वरूपात प्रेझेन्ट करायला गेलास. परंतु ठीक आहे, तू इतके मोठे धाडस केलेस हेही करायला हिंमत लागते. एक यशस्वी दिग्दर्शक तर तू आहेसच, यापुढे देखील नवनवीन विषय घेऊन चित्रपट बनवशिल अशी खात्री आहे.
तुझा हितचिंतक
प्रताप सरनाईक