मोठी बातमी ! आदिपुरुष सिनेमावर बंदी आणा, शिंदे गटाच्या खासदाराची मागणी; केंद्रीय मंत्र्याला पत्र

| Updated on: Jun 21, 2023 | 2:44 PM

आदिपुरुष या सिनेमावरून सुरू झालेला वाद अजून थांबताना दिसत नाही. काठमांडूमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आल्यानंतर आता या सिनेमावर भारतातही बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मोठी बातमी ! आदिपुरुष सिनेमावर बंदी आणा, शिंदे गटाच्या खासदाराची मागणी; केंद्रीय मंत्र्याला पत्र
adipurush
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : आदिपुरुष या सिनेमावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबताना दिसत नाही. या सिनेमाच्या कथानकापासून वेषभूषा आणि संवादावरही आक्षेप घेण्यात आला आहे. इतिहास आणि तथ्याला धरून हा सिनेमा बनवण्यात आला नसल्याची टीका या सिनेमावर होत आहे. या सिनेमाच्या विरोधात काही हिंदुत्वादी संघटनाही मैदानात उतरल्या आहेत. तर नेपाळमध्ये ही या सिनेमावरून वादंग उठला आहे. हा सिनेमा काठमांडूत दाखवला जाणार नाहीये. तर दुसरीकडे भाजपच्या काही खासदारांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. असं असतानाच आता या वादात शिंदे गटानेही उडी घेतली असून शिंदे गटाच्या खासदाराने मोठी मागणी केली आहे.

शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आदिपुरुष सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आदिपुरुषमुळे भारताची बदनामी होत असल्याचा दावा श्रीरंग बारणे यांनी केला आहे. श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रसून जोशी यांना पत्र लिहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सिनेनिर्मात्याची चांगलीच कोंडी झाली आहे. तर शिंदे गटाच्या या मागणीने भाजपचीही कोंडी झाली आहे. भाजपचे खासदार आणि अभिनेत रवी किशन यांनी या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. हा सिनेमा आजच्या पिढीशी सुसंगत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

नालासोपाऱ्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी आदिपुरुष सिनेमाच्या विरोधात जोरदार निदर्शने केले. नालासोपाऱ्यातील सिनेमागृहात हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी करत हा सिनेमा बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली. यावेळी जय श्रीरामचे नारेही देण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या हिंदुत्ववादी संघटनांना समजावले होते.

काठमांडूत सिनेमावर बंदी

नेपाळची राजधानी काठमांडूत या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी आदिपुरुषमधील संवादावर आक्षेप घेतला आहे. तसेच काठमांडूत फक्त आदिपुरुषच नव्हे तर सर्वच भारतीय सिनेमांवर बंदी घातली आहे. नेपाळचं प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या पोखरामध्येही आदिपुरुषवर बंदी घालण्यात आली आहे.

आम्ही काठमांडूतील सर्व थिएटरमधून हिंदी सिनेमे हटवले आहेत. त्याऐवजी हॉलिवूडचे सिनेमे आणि नेपाळी सिनेमे प्रदर्शित केले आहेत, असं शाह यांनी म्हटलं आहे. सिनेमात सीतेला भारताची कन्या दाखवण्यात आल्यानं त्यावर महापौरांनी आक्षेप घेतला आहे. यात दुरुस्ती करावी, त्यासाठी आम्ही तीन दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत, असा इशारा महापौरांनी दिला आहे.