Adipurush: ‘आदिपुरुष’च्या टीझरवर ‘शक्तीमान’ची तिखट प्रतिक्रिया; निर्मात्यांची केली कानउघडणी
"फक्त VFX किंवा 100-1000 कोटींच्या गुंतवणुकीने रामायण बनत नाही तर.."
मुंबई- आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी या चित्रपटातील VFX आणि कलाकारांच्या लूकवरून टीका केली आहे. आता ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी आदिपुरुषच्या टीझरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय.
आदिपुरुषच्या टीझरवर मुकेश खन्ना म्हणाले, “कदाचित प्रत्येकजण माझ्या या मताशी सहमत नसेल. पण हिंदू देवता हँडसम नाहीत तर ते सुंदर आहेत. ते अर्नॉल्ड श्वार्झनेगरसारखे (अभिनेता) हँडसम नाहीत. उदाहरण म्हणून तुम्ही राम किंवा कृष्णाकडे पहा, ते बॉडीबिल्डर नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर नम्र, शालीन भाव असतात. कोणीही असा दावा करू शकत नाहीत की ते राम किंवा कृष्णाला भेटले आहेत. परंतु आपण वर्षानुवर्षे जे पाहिलंय, त्यावरून ते कसे दिसत असतील याचा अंदाज लावू शकतो. त्यांची पूजा, आराधना करणारे लोक कधीच मिशा असलेला राम किंवा हनुमानाचा विचार करत नाहीत.”
“तुम्ही चित्रपटाला आदिपुरुष असं नाव देता. तुम्ही मला सांगाल की ती पाषाण युगातील एका माणसाची कथा आहे. पण मग तुम्हाला रामायणाशी संबंधितच शीर्षक का हवाय? भीष्म पितामह यांच्या भूमिकेसाठी (महाभारतातील मुकेश खन्ना यांची भूमिका) आम्ही खूप मोठी दाढी ठेवली होती. तुम्ही त्या भूमिकेला क्वीन-शेव्हमध्ये दाखवू शकत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की असा चित्रपट चालणार नाही. तुम्हाला रामायणावर असलेला लोकांचा विश्वास वापरायचा आहे म्हणून तुम्ही त्या विश्वासाला आव्हानसुद्धा देऊ पाहताय”, असं ते पुढे म्हणाले.
अमाप पैसा आणि मोठ्या व्हिएफएक्समुळे एखादा चित्रपट चांगला बनू शकत नाही, असंही ते म्हणाले. “रामायण आणि मुघल शासक अशा लूक्सची तुलना होऊच शकत नाही. तुम्ही या सगळ्याची चेष्टा करत आहात का? मी थेट बोलतोय म्हणून मला माफ करा पण असा चित्रपट चालणार नाही. फक्त VFX किंवा 100 ते 1000 कोटींची गुंतवणूक केल्याने रामायण बनू शकत नाही. रामायण हा मूल्यांवर आणि उत्तम कामगिरीवर आधारित असला पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी निर्मात्यांची कानउघडणी केली.
“आम्ही ‘अवतार’मधील लूक वापरून रामायण बनवत आहोत, असं तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही जर पात्रांची खिल्ली उडवली तर लोक फक्त तुमच्यावर हसणारच नाहीत तर त्यांना तुमच्यावर रागसुद्धा येईल. त्यापेक्षा प्राचीन माणसांबद्दल एक काल्पनिक कथा बनवत आहोत, असं तुम्ही म्हणा. पण याला रामायण म्हणू नका. मी श्रीमंत लोकांना इशारा देतो की तुमचे पैसे हे आमचे विधी, धर्म किंवा महाकाव्यं बदलण्यासाठी वापरू नका. तुमची इच्छा असल्यास ते प्रयोग इतर धर्मांसोबत”, अशी सडेतोड प्रतिक्रिया मुकेश खन्ना यांनी दिली.