Vivek Agnihotri यांच्या हिमतीची दाद, The kashmir Files सारखे आणखी सिनेमे यायला हवेत- नवाजुद्दीन सिद्दीकी
The kashmir Files :'द काश्मीर फाईल्स' सिनेमा आणि त्याच्याभोवती घोंघावणारं चर्चांच वादळ शमण्याचं नाव घेत नाहीये. सर्वच स्तरातून या सिनेमावर भाष्य केलं जातंय. अॅक्टिंगचा बादशाह नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही'द काश्मीर फाईल्स' या सिनेमावर भाष्य केलंय.
मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा आणि त्याच्याभोवती घोंघावणारं चर्चांच वादळ शमण्याचं नाव घेत नाहीये. सर्वच स्तरातून या सिनेमावर भाष्य केलं जातंय. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असो, किंवा अन्य कुणी… सगळेच जण याविषयी बोलताना दिसतात. बॉलिवूडमधली मंडळीही यावर बोलत आहेत. अॅक्टिंगचा बादशाह नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांनीही’द काश्मीर फाईल्स’ (The kashmir Files) या सिनेमावर भाष्य केलंय. “विवेक अग्नीहोत्री यांच्या हिमतीची दाद द्यायला हवी, त्यांनी हा वेगळा विषय हाताळला. असेच वेगळ्या धाटणीचे सिनेमे यायला हवेत”, असं नवाजुद्दीन म्हणाले आहेत. ते एबीपी नेटवर्कच्या आयडियाज् ऑफ इंडिया या कार्यक्रमात बोलत होते.
नवाज यांना हॉलिवूड सिनेमांविषयी प्रश्न विचारण्यात आला की, हॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त भारतीय कलाकारांनी काम करायला हवं असं तुम्हाला वाटतं का? त्यावर बोलताना “सतत आपण त्या सिनेमांमध्ये काम करावं, अशी आशा का बाळगायची? त्यापेक्षा आपण चांगले सिनेमे करूयात जे तिकडं पाहिले जातील. त्यासाठी हिमतीची गरज आहे, जशी आता विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून दाखवली. तसे आणखी सिनेमे तयार व्हायला हवेत”, असं नवाज म्हणाले. पुढे त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही अश्या सिनेमांचं दिग्दर्शन करू इच्छिता का? त्यावेळी ते म्हणाले की “तो माझा प्रांत नाही पण मी अश्या सिनेमांमध्ये काम जरूर करू इच्छितो”, असंही नवाज म्हणाले.
“दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून तो सिनेमा बनवतो. त्याला त्यासाठी तेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मी अजून हा सिनेमा पाहिलेला नाही. पण अश्या विषयांवर सिनेमे बनवले पाहिजेत. येत्या काळातही असे सिनेमे बनवले जावेत”, असंही नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणालेत.
या मुलाखतीत त्यांनी ओटीटी माध्यमावरही भाष्य केलं. “ओटीटीवर याआधी चांगले विषय हाताळले जायचे पण आता तसं होताना दिसत नाही. आम्ही आधी खूप दर्जेदार काम केलं पण आता स्टार या माध्यमावर येत आहेत. ते तेवढ्या दर्जाची कलाकृती निर्माण करत नाहीत याची खंत आहे”, असंही नवाज म्हणाले.
संबंधित बातम्या