Nitin Desai | जीवन संपवलं, पण त्याआधी बनवला धनुष्यबाण, शेवटची इच्छाही लिहिली
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये स्वत:ला संपवलं. नितीन देसाई यांनी उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे कलाविश्वात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : एका कलाकाराचं त्याच्या कलेवर किती प्रेम असतं हे आपण शब्दांमध्ये कधीही व्यक्त करु शकत नाहीत किंवा ते सांगूही शकत नाही. कलाकार आपल्या कलेसाठी स्वत:ला वाहून घेतो. त्याची कलेवर आस्था असते. तो आपल्या कलेसाठी अविरतपणे मेहनत घेतो. दिवस-रात्र झटत असतो. तो न थकता काम करत असतो. आपल्या कलेचं चीज व्हावं, त्यातून मोठा साक्षात्कार घडून यावा यासाठी तो मेहनत घेत असतो. देशाने नितीन देसाई यांच्या रुपाने आज खूप मोठा कलाकार गमावला आहे. नितीन देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या करत स्वत:ला संपवलं. पण नितीन देसाई यांनी स्वत:ला संपवण्याआधी एक नोट लिहिली आहे.
नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याआधी एक छोटी नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या पार्थिवावर एनडी स्टुडिओच्या जागेवर अंत्यविधी करण्यात यावा, असं लिहिलं आहे. यातून त्यांचा एनडी स्टुडिओमध्ये किती जीव गुंतला होता, हे स्पष्ट होतंय. नितीन देसाई यांचा कर्जतला मोठा स्टुडिओ होता. पण कोरोना काळापासून ते आर्थिक विवंचनेत होते. ते कर्जबाजारी होते. त्यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी 180 कोटींचं कर्ज घेतलं होतं. एडलवाईज असेट कंपनीने देसाई यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. देसाईंनी 2020 पासून व्याज देणं बंद केलं होतं, असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता. कर्जवसुलीसंदर्भात 25 जुलैला NCTL कोर्टात सुनावणी पार पडली होती. त्यावेळी कोर्टाने कायदेशीर कारवाईची सूचना दिली होती. कर्जवसुलीसाठी एडलवाईज कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिलेला. मालमत्ता जप्त करुन कर्जवसूली करण्याचा प्रस्ताव दिला होता, अशी देखील माहिती मिळत आहे.
नितीन देसाईंनी देह दिला पण जीव अजूनही स्टुडिओ
कोर्टाच्या आदेशानंतर कदाचित एनडी स्टुडिओवर जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती नितीन देसाई यांना वाटत तर नव्हती ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. देसाई यांचं त्यांच्या स्टुडिओवर खूप प्रेम होतं. त्यांचा स्टुडिओवर जीव होता. त्यामुळे त्यांनी आपल्यावर स्टुडिओच्या जागेवर अंत्यविधी करण्यात यावं, असं म्हटलं आहे. देसाई हे कलाकार होते. कलाकार आपल्या कलेसाठी, तिला जपण्यासाठी काहीही करु शकतो, असं म्हणतात. त्यामुळे नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून असा टोकाचा निर्णय घेतला तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
जीवन संपवण्याआधी नितीन देसाई यांना का बनवला दोरीचा धनुष्यबाण?
दरम्यान, नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांनी गळफास घेण्यापूर्वी जमिनीवर दोरीच्या साहाय्याने एक धनुष्यबाणाची प्रतिकृती बनवली होती. या धनुष्यबाणात बाणाचं टोक असलेल्या ठिकाणच्या अगदी वर त्यांनी गळफास घेतलाय. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेल्या धनुष्यबाणाचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
नितीन देसाई यांनी ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्या
नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी एका साऊंड रेकॉर्डरमध्ये काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत. तो साऊंड रेकॉर्डर सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याचबरोबर देसाई यांनी एक शॉर्ट नोट लिहून ठेवलीय ज्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे ND स्टुडिओमधील जागेवरच करावेतं असं लिहिण्यात आलंय.