Pakistan floods: दाऊदची कथित गर्लफ्रेंड बॉलिवूडवर भडकली; पाकिस्तानच्या पुरावरून साधला निशाणा
मेहविश ही पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. राजकारणाच्याही वर जाऊन ते पाकिस्तानातील चाहत्यांबद्दल काळजी व्यक्त करू शकतात हे दाखवून देण्याचं आवाहन मेहविशने बॉलिवूड सेलिब्रिटींना केलंय.
पाकिस्तानी अभिनेत्री आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कथित गर्लफ्रेंड मेहविश हयातने (Mehwish Hayat) बॉलिवूडवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान भीषण पुराचा (Pakistan floods) सामना करत असताना बॉलिवूडने त्याबद्दल बाळगलेलं मौन निराशाजनक असल्याचं मेहविशने म्हटलंय. एकीकडे जगातील इतर लोक त्यावर बोलत आहेत, मात्र बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींना त्यांच्या पाकिस्तानी चाहत्यांची चिंता नाही, असंही तिने म्हटलंय. मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने पाकिस्तानमध्ये सध्या मदतकार्य सुरू आहे. या भीषण पुरात जवळपास 1,265 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
मेहविश ही पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. राजकारणाच्याही वर जाऊन ते पाकिस्तानातील चाहत्यांबद्दल काळजी व्यक्त करू शकतात हे दाखवून देण्याचं आवाहन मेहविशने बॉलिवूड सेलिब्रिटींना केलंय. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका पत्रकाराची पोस्ट शेअर करत हा मुद्दा उपस्थित केला आहे.
‘बॉलिवूड सेलिब्रिटींचं मौन अत्यंत निराशाजनक आहे. दु:खाला कोणतंच राष्ट्रीयत्व, वंश किंवा धर्म नसतं. राष्ट्रवादी राजकारणाच्या वर जाऊन ते पाकिस्तानमधील चाहत्यांची काळजी करू शकतात हे दाखवण्याची याहून चांगली वेळ नाही. आम्हाला अतीव दु: ख होत आहे. त्यावर तुम्ही दोन शब्द नक्कीच बोलून सहानुभूती व्यक्त करू शकता’, असं मेहविशने लिहिलंय.
पत्रकाराने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘मला खरंच वाटलं होतं की मानवतेला कोणतीही सीमा माहीत नाही. परंतु क्वचितच एखाद्या बॉलिवूड स्टारने पाकिस्तानमधील विनाशकारी पुराबद्दल पोस्ट केली आहे. जागरुकता वाढवा, लिंक्स शेअर करा, किमान सहानुभूती तरी दाखवा. त्यांना माहीत आहे की ते किती लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या पोस्टला किती महत्त्व असेल.’
मेहविश ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आणि बीबीसीसारख्या चॅनेलला मुलाखती देऊन पाकिस्तानमधील पुरामुळे झालेल्या विनाशाबद्दल जनजागृती करत आहे. सुपरमॉडेल बेला हदीदनेही नुकतीच एक क्लिप शेअर केली होती. पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना कशी मदत करावी याबद्दल माहिती देण्याची विनंती तिने नेटकऱ्यांना केली होती. नेटफ्लिक्सच्या ‘नेव्हर हॅव आय एव्हर’ या सीरिजमधील अभिनेत्री पूर्णा जगन्नाथ हिनेसुद्धा पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर आलेल्या पुराबद्दल पोस्ट लिहिली होती.