या चित्रपटानं बॉलिवूडमध्ये उडवली होती खळबळ, तिकिटासाठी 5 किलोमीटरपर्यंत रांगा, लोक दोन-दोन दिवस रस्त्यावर झोपायचे
हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक क्लासिक चित्रपट बनले, मात्र आजही 65 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाचा रेकॉर्ड अजूनही कोणीही तोडू शकलेलं नाहीये.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक क्लासिक चित्रपट बनले, मात्र आजही 65 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटाचं रेकॉर्ड अद्याप कोणत्याही चित्रपटाला तोडता आलेलं नाहीये. या चित्रपटाकडे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून पाहिलं जातं. हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागडा चित्रपट ठरला होता. त्या काळात निर्माण झालेल्या चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाचं बजेट हे खूप मोठं होतं. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला अनेकदा विलंब झाला, त्यामुळे हा चित्रपट त्याच्या नियोजित वेळेपेक्षा उशिरानं प्रदर्शित करण्यात आला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच हिट ठरला. त्या कळात या चित्रपटाची क्रेज एवढी होती, की कित्येक दिवस लोक या चित्रपटाचं तिकीट मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावायचे.
या चित्रपटामध्ये दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर आणि मधुबाला यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाबाबत बोलताना रजा मुराद यांनी आपला अनुभव सांगितला. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा रजा मुराद हे दहा वर्षांचे होते. रजा मुराद यांच्या वडिलांनी देखील या चित्रपटामध्ये भूमिका केली होती. रजा मुराद यांच्या वडिलांनी या चित्रपटामध्ये राजा मानसिंह यांची भूमिका केली होती.या चित्रपटाबाबत बोलताना रजा मुराद यांनी सांगितलं की या चित्रपटाची क्रेझ त्याकाळात एवढे होती, की हा चित्रपट पाहाण्यासाठी लोकांनी तब्बल पाच किलोमिटरची रांग लावली होती. तरी देखील दोन दिवस त्यांना तिकीट मिळालं नव्हतं. आपल्यालाही हा चित्रपट पाहायला मिळावा, यासाठी लोक रस्त्यावर झोपले होते, रांगाचं रांगा पाहायला मिळाल्या असं रजा मुराद यांनी म्हटलं आहे.
रस्त्यावर झोपायचे लोकं
रजा मुराद यांनी एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, त्या काळामध्ये या चित्रपटाची एवढी क्रेझ होती की एखाद्याला या चित्रपटाचं सोमवारसाठी अॅडवान्स बुकिंग करायचं असेल तर दोन दिवस आधी म्हणजे शनिवारपासून रांगेत उभं राहावं लागायचं. लोकांच्या चित्रपट थेअटरबाहेर पाच -पाच किलोमीट रांगा लागायच्या, लोक रस्त्यावर झोपायचे, त्यांचे कुटुंबातील लोक त्यांना तिथेच जेवण आणून द्यायचे.