Prithviraj Kapoor Birth Anniversary | हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘मुघल-ए-आझम’, वाचा पृथ्वीराज कपूर यांच्याशी संबंधित खास किस्से…
हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मुघल-ए-आझम' म्हटल्या जाणाऱ्या अभिनेते पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांचा आज स्मृतिदिन आहे. जगातल्या हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक नवा आयाम दिला आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘मुघल-ए-आझम’ म्हटल्या जाणाऱ्या अभिनेते पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांचा आज स्मृतिदिन आहे. जगातल्या हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक नवा आयाम दिला आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. पृथ्वीराज कपूर यांनी मूकपटांपासून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि रंगीत चित्रपटांपर्यंतचा प्रवास केला. पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 रोजी पाकिस्तानातील समुद्री येथे झाला. लोक त्यांना ‘बॉलिवुडचे ग्रँड फादर’ म्हणतात. त्यांच्या वाढदिवसाच्या खास निमित्त त्यांच्याशी संबंधित रंजक किस्से जाणून घेऊया…
पृथ्वीराज कपूर यांनी लाहोरच्या एडवर्ड कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी नाटक आणि नाट्यक्षेत्रात काम करण्याचा विचार केला. पण जास्त शिकलेले असल्यामुळे त्यांना नाटकात काम मिळालं नाही. यानंतर ते 1929 मध्ये मुंबईत आले आणि इम्पीरियल फिल्म कंपनीत विनापगार अतिरिक्त कलाकार म्हणून काम करू लागले.
‘आलमआरा’ या पहिल्या बोलक्या चित्रपटात केले काम!
पृथ्वीराज कपूर यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी ‘आलमआरा’ या पहिल्या बोलक्या चित्रपटात तारुण्यापासून वृद्धापकाळापर्यंतची भूमिका साकारली होती. 1941 मध्ये आलेल्या ‘सिकंदर’मध्ये त्यांनी सिकंदरची भूमिका केली होती. 1960 मध्ये ‘मुघल-ए-आझम’ची भूमिका साकारून ते एक ‘माईल स्टोन’ बनले. ‘आलमआरा’पूर्वी पृथ्वीराज कपूर यांनी 9 मूकपटांमध्ये काम केले होते. 1929 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सिनेमा गर्ल’ हा मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्यांना 70 रुपये मानधन मिळाले होते.
‘मुघल-ए-आझम’मधील अकबर ही व्यक्तिरेखा ठरली मैलाचा दगड!
1960 मध्ये त्यांनी ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटामध्ये अकबराची भूमिका साकारली होती. हे पात्र त्यांच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरले. त्यांचा जबरदस्त अभिनय आजही लोकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात दिलीप कुमार, मुधुबाला, दुर्गा खोटे आणि निगार सुलतान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. चित्रपटाची रंगीत आवृत्ती 2004 साली प्रदर्शित झाली होती.
1944 मध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना
पृथ्वीराज कपूर यांनी 1944 मध्ये पृथ्वी थिएटर्सची स्थापना केली. हे थिएटर देशभर गाजले होते. 16 वर्षांच्या प्रवासात त्यांनी जवळपास 2662 नाटके सादर केली होती. आजकाल या थिएटरची देखभाल शशी कपूर यांची मुलगी संजना करत आहे. बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाची गणना प्रसिद्ध कुटुंबांमध्ये केली जाते. शशी कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूर, राज कपूर, रणबीर, करीना, करिश्मा कपूर असे अनेक स्टार्स या घराण्यातून बॉलिवूडला मिळाले आहेत.
पृथ्वीराज कपूर यांचा शेवटचा चित्रपट ‘आवारा’, ‘कल आज और कल’ ज्यामध्ये कपूर कुटुंबातील तीन पिढ्यांनी काम केले. 29 मे 1971 रोजी पृथ्वीराज कपूर यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.