Raj Babbar: 26 वर्षे जुन्या प्रकरणात राज बब्बर यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा
न्यायालयाने 7 मार्च 2020 रोजी 24 वर्षांनी राज बब्बरवर आरोप निश्चित केले. श्रीकृष्ण सिंह राणा, शिवकुमार सिंह, मनोज श्रीवास्तव, चंद्रदास साहू, डॉ एम. एस. कालरा यांनी साक्ष दिली. राज बब्बर यांनी 10 मे 2022 रोजी न्यायालयात निर्दोष असल्याची विनंती केली, परंतु कोणताही पुरावा देण्यास नकार दिला.
माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर (Raj Babbar) यांना 26 वर्षे जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान अधिकाऱ्यावर हल्ला आणि इतर प्रकरणांमध्ये खासदार-आमदार न्यायालयाने (MP/MLA court) त्यांना 6500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हे प्रकरण घडलं त्यावेळी राज बब्बर हे सपाचे (Samajwadi Party) उमेदवार होते. तर या प्रकरणातील आरोपी अरविंदसिंग यादव याचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला. न्यायालयाने राज बब्बर यांना विविध कलमांतर्गत 6 महिने तुरुंगवास आणि 1000 रुपये दंड, दोन वर्षे कारावास आणि 4 हजार दंड, एक वर्ष कारावास आणि 1000 दंड, सहा महिने कारावास आणि 500 रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्यांना आणखी 15 दिवस कारावास भोगावा लागणार आहे. कोर्टाने निकाल जाहीर केला तेव्हा राज बब्बर कोर्टात हजर होते आणि त्यानंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली.
बनावट मतदान केल्याच्या आरोपावरून मारहाण
माजी खासदार राज बब्बर यांना 1996 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान अधिकाऱ्याला मारहाण आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. सरकारी वकील सोनू सिंह यांच्या म्हणण्यानुसार, 2 मे 1996 रोजी मतदान अधिकारी श्रीकृष्ण सिंह राणा यांनी वजीरगंज पोलिस ठाण्यात तत्कालीन सपा उमेदवार राज बब्बर, अरविंद यादव आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली होती.
मतदार यायचे थांबले तेव्हा ते जेवायला जात होते, असा आरोप केला गेला. त्यानंतर सपाचे उमेदवार राज बब्बर हे आपल्या सहकाऱ्यांसह आले आणि त्यांनी बनावट मतदानाचे खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी व शिवकुमार सिंह यांना मारहाण केली आणि या मारहाणीत ते जखमी झाले. त्यांना मतदान अधिकारी मनोज कुमार श्रीवास्तव यांच्याशिवाय व्ही के शुक्ला आणि पोलिसांनी वाचवलं. 23 सप्टेंबर 1996 रोजी पोलिसांनी राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केलं होतं.
न्यायालयाने 7 मार्च 2020 रोजी 24 वर्षांनी राज बब्बरवर आरोप निश्चित केले. श्रीकृष्ण सिंह राणा, शिवकुमार सिंह, मनोज श्रीवास्तव, चंद्रदास साहू, डॉ एम. एस. कालरा यांनी साक्ष दिली. राज बब्बर यांनी 10 मे 2022 रोजी न्यायालयात निर्दोष असल्याची विनंती केली, परंतु कोणताही पुरावा देण्यास नकार दिला.