Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत पूर्वीपेक्षा सुधारणा, जाणून घ्या कॉमेडियनचे ताजे हेल्थ अपडेट
कुशलने सांगितले की, सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र, त्यांना अजूनही एम्स रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या एमआरआय रिपोर्टमध्ये त्यांच्या प्रकृतीशी संबंधित एक मोठा खुलासाही समोर आला आहे.
मुंबई : आपल्या जबरदस्त कॉमेडीने सर्वांना पोटधरून हसवणारा अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) सध्या मृत्यूशी झुंज देतोयं. राजू श्रीवास्तव यांचे चाहते देवाकडे त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी सातत्याने प्रार्थना करत आहेत. दररोज त्यांच्या तब्येती संबंधित अपडेट्स (Updates) समोर येत असतात. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना दिल्लीच्या (Delhi) एम्समध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. चाहत्यांच्या नजरा राजू श्रीवास्तव यांच्याशी संबंधित प्रत्येक बातमीवर आहेत. राजू श्रीवास्तव यांचा पुतण्या कुशल श्रीवास्तवकडून तब्येतीचे अपडेट मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
जाणून घ्या राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीचे नवे अपडेट
कुशलने सांगितले की, सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र, त्यांना अजूनही एम्स रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या एमआरआय रिपोर्टमध्ये त्यांच्या प्रकृतीशी संबंधित एक मोठा खुलासाही समोर आला आहे. माहितीनुसार राजू यांच्या एमआरआय रिपोर्ट आला असून, त्यात त्याच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना बरे होण्यासाठी आणखी 10 दिवस लागू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
एमआरआय रिपोर्ट देखील आला पुढे
वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांचा 13 ऑगस्ट रोजी एमआरआय करण्यात आला होता. तसेच, राजू यांचे संपूर्ण कुटुंब सध्या एम्समध्येच आहे आणि त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. कुटुंबाने सोशल मीडियावर राजू यांच्याशी संबंधित कोणत्याही खोट्या अफवा पसरवू नका किंवा त्याकडे लक्ष देऊ नका अशी विनंती सर्वांना केलीयं. मात्र, राजू श्रीवास्तव लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी संपूर्ण देशातील चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जात आहेत.