Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला यांचं बॉलिवूड कनेक्शन; ‘इंग्लिश विंग्लिश’सह इतर अनेक सुपरहिट चित्रपटांची केली निर्मिती
राकेश झुनझुनवाला हे निर्मातेदेखील होते. व्यवसायासोबतच चित्रपटसृष्टीचीही त्यांना विशेष ओढ होती, असं म्हटलं जातं. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार आणि अब्जाधीश उद्योगपती राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं निधन झालं. भारताचे वॉरेन बफे म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 62 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झुनझुनवाला यांनी अकासा एअरलाइन्स सुरू केली. त्यांचं बॉलिवूडशीही (Bollywood) जवळचं नातं होतं. अकासा एअरलाइन्सची सर्वात मोठी भागीदारी त्यांची पत्नी रेखा आणि झुनझुनवाला यांच्याकडे होती. रिपोर्ट्सनुसार, दोघांची अकासा एअरलाइन्समध्ये 45.97 टक्के भागीदारी होती. 5 जुलै 1960 रोजी राजस्थानी कुटुंबात जन्मलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी इंडस्ट्रीत अशी कामे केली आहेत, ज्याची अनेक उदाहरणं दिली जातात. ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईत (Mumbai) राहत होते.
त्यांना स्टॉक मार्केटचा बिग बुल असंदेखील म्हटलं जातं. त्यांनी अकासा एअरलाइन्सला अशा उंचीवर नेलं ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अवघे पाच हजार रुपये घेऊन शेअर बाजारात उतरलेले राकेश झुनझुनवाला हे मधुमेह आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते. रविवारी सकाळी 6.40 च्या सुमारास त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती
राकेश झुनझुनवाला हे निर्मातेदेखील होते. व्यवसायासोबतच चित्रपटसृष्टीचीही त्यांना विशेष ओढ होती, असं म्हटलं जातं. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली. ज्यामध्ये इंग्लिश विंग्लिश, शमिताभ, की अँड का यांचा समावेश आहे. 1999 मध्ये त्यांनी हंगामा डिजिटल मीडिया ही ऑनलाइन प्रमोशन एजन्सी म्हणून सुरू केली, त्यानंतर ते अध्यक्ष झाले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी त्याचं नाव बदलून हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड केलं. 2021 मध्ये हंगामा म्युझिक आणि हंगामा प्ले देखील OTT प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले.
झुनझुनवाला यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ते खवय्ये होते. विशेषतः त्यांना स्ट्रीट फूडची खूप आवड होती. चायनीज फूड त्यांना खूप आवडायचं. त्यांना पावभाजीही खूप आवडायची. इतकंच नाही तर ते त्यांच्या फावल्या वेळेत फूड शो बघायचे.