आठवडाभरात ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरात केली एवढी कमाई; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल 75 कोटींची कमाई केली होती आणि पुढच्या दोन दिवसांत म्हणजेच पहिल्या आठवड्यातच चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने 225 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत चांगलीच कमाई केली. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन आज सात दिवस म्हणजेच एक आठवडा पूर्ण झाला आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या चार दक्षिण भाषांमध्ये प्रदर्शित झाला. ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातील कमाईचा 300 कोटींचा आकडा पार केला आहे.
चित्रपट निर्माता करण जोहरने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं यश कु या ॲपवर शेअर केलं आहे. चित्रपटाने एक आठवडा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताना तो म्हणाला, “प्रेम आणि प्रकाश या जगावर राज्य करत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ठरला आहे. आता कृतज्ञता आणि उत्साहाने भरलेल्या अंतःकरणाने आम्ही दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहोत.’
9 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला चित्रपट
या चित्रपटाने भारतात 208 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात सुमारे 308 कोटींचा आकडा पार केला आहे. जगभरातील 9000 स्क्रीन्सवर ब्रह्मास्त्र प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल 75 कोटींची कमाई केली होती आणि पुढच्या दोन दिवसांत म्हणजेच पहिल्या आठवड्यातच चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने 225 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई
‘ब्रह्मास्त्र’ने भारतात पहिल्या दिवशी 36 कोटी 42 लाख, दुसऱ्या दिवशी 41 कोटी 36 लाख, तिसऱ्या दिवशी 45 कोटी 66 लाख, चौथ्या दिवशी 16 कोटी 50 लाख, पाचव्या दिवशी 12 कोटी 68 लाख, सहाव्या दिवशी 11 कोटी आणि सातव्या दिवशी सुमारे 10 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिल्या आठवड्यात 308 कोटींहून अधिक कमाई
पहिल्या आठवड्यात भारतात ‘ब्रह्मास्त्र’ने 175 कोटींची कमाई केली. तर देशातील आतापर्यंतची कमाई ही 208 कोटींपर्यंत पोहोचली आहे. आता दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.