घटस्फोट, मृत्यू अन् अपमान.. समंथाच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
समंथा (Samantha) नेहमीच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करत मनातील भावनांना वाट मोकळी करून देते. तिने नुकतीच अशी एक पोस्ट शेअर केली आहे.

टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेता नाग चैतन्यला (Naga Chaitanya) घटस्फोट दिल्यानंतर ती नेहमीच तिच्या भावनांबद्दल सोशल मीडियावर मोकळेपणाने व्यक्त झाली आहे. समंथा तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करत तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देते. तिने नुकतीच अशी एक पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोट, मृत्यू, भय आणि अपमान यांच्यासंदर्भातील या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसिद्ध हॉलिवूड स्टार विल स्मिथच्या (Will Smith) ‘विल’ या पुस्तकातील काही ओळी तिने पोस्ट केल्या आहेत. ‘विल’ हे पुस्तक वाचत असताना समंथाना भावलेल्या या काही ओळी आहेत.
काय आहे समंथाची पोस्ट? ‘गेल्या तीस वर्षांत, आपल्या सर्वांप्रमाणेच एकाला अपयश, नुकसान, अपमान, घटस्फोट आणि मृत्यू अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे. मी माझा जीव धोक्यात घातला, माझे पैसे काढून घेतले गेले, माझ्या खासगी आयुष्यात घुसखोरी झाली, माझं कुटुंब विस्कळीत झालं. तरीही प्रत्येक दिवशी मी उठलो, काँक्रीट मिसळलं आणि दुसरी वीट लावली. तुम्ही काहीही करत असाल तरीही नेहमीच तुमच्यासमोर दुसरी वीट असेल. तुम्ही उठून ती लावाल यासाठी ती वाट पाहत असेल. प्रश्न एवढाच आहे की, तुम्ही उठून ती वीट लावणार आहात का?”, अशा आशयाची पोस्ट समंथाने शेअर केली आहे. या पोस्टसोबत समंथाने लिहिलं, ‘मेहनत करा, तुमच्या चुकांमधून शिका, आत्मपरिक्षण करा, स्वत:मध्ये नाविन्य आणा आणि कधीच हार मानू नका. ओह या सगळ्यात विनोदी स्वभावाची फार मदत होते. किती सुंदर आणि आकर्षक पुस्तक आहे, विल.’
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये समंथा आणि नाग चैतन्यने घटस्फोट घेतला. २०१० मध्ये ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. ऑक्टोबर २०१७ मध्ये समंथा-नाग चैतन्यने गोव्यात लग्नगाठ बांधली. चार वर्षांच्या संसारानंतर ही लोकप्रिय जोडी विभक्त झाली.
संबंधित बातम्या: अफेयर, करिअर की आणखी काही? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय?
संबंधित बातम्या: समंथा प्रभूची आयटम साँगसाठी प्रचंड मेहनत, ‘Oo Antava’चा हा रिहर्सल व्हिडीओ पाहिला का?