परवाच मनसोक्त होळी खेळले अन् आज जगाचा निरोप घेतला; सतिश कौशिक यांच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडला धक्का
सतिश कौशिक यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चांगल्या भूमिका केल्या. मिस्टर इंडियापासून ते दिवाना मस्तानापर्यंतच्या त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.
मुंबई : आपल्या विविधांगी भूमिकांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे आणि चेहऱ्यावर कायम हास्य असलेले अभिनेते, दिग्दर्शक सतिश कौशिक यांचं आज निधन झालं. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सतिश कौशिक यांचं अचानक निधन झाल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतिश कौशिक या जगात राहिले नाहीत या वृत्तावर बॉलिवूड अभिनेत्यांचा विश्वासच बसत नाहीये. अनेकांनी तर ट्विट करून हा आपल्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे.
परवाच सतिश कौशिक यांनी अत्यंत जल्लोषात होळीचा उत्सव साजरा केला होता. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी जुहू येथे होळीच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात सतिश कौशिक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या सहकारी कलाकरांसोबत होळीचा आनंदही लुटला होता. जावेद अख्तर, रिचा चढ्डा, अली फजल आणि महिमा चौधरींसोबत त्यांनी होळी खेळतानाचे फोटोही काढले होते.
त्यांनी हे फोटो ट्विटरवर शेअरही केले होते. या फोटोत कौशित अत्यंत प्रसन्न मुद्रेत दिसत आहेत. मौजमजा करताना दिसत आहेत. ते आजारी आहेत, असं कुठेही वाटत नाही. आणि आज मात्र सतिश कौशिक यांच्या निधनाची बातमी येऊन धडकल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडचे अभिनेते आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का आहे.
Colourful Happy Fun #Holi party at Janki Kutir Juhu by @Javedakhtarjadu @babaazmi @AzmiShabana @tanviazmi.. met the newly wed beautiful couple @alifazal9 @RichaChadha.. wishing Happy Holi to everyone ??????? #friendship #festival #Holi2023 #colors pic.twitter.com/pa6MqUKdku
— satish kaushik (@satishkaushik2) March 7, 2023
दोन वर्षाचा मुलगा गेला…
अभिनेते सतिश कौशिक यांचा विवाह 1985मध्ये शशी कौशिक यांच्याशी झाला होता. लग्नानंतर एक वर्षाने त्यांना मुलगाही झाला होता. मात्र, त्यांच्या मुलाचं दोन वर्षाचा असताना मृत्यू झाला होता. त्यामुळे सतिश कौशिक यांना मोठा धक्का बसला होता. पुत्र वियोगामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला होता.
16 वर्षानंतर पुन्हा बाप बनले
दोन वर्षाचा मुलगा गेल्यानंतर सतिश कौशिक यांना धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा कसंबसं आयुष्य सुरू केलं. 16 वर्षानंतर म्हणजे 2012 मध्ये त्यांच्या घरात पुन्हा नव्या पाहुण्याचं आगमन झालं. सरोगसीच्या मदतीने त्यांच्या घरात मुलीने जन्म घेतला. मुलीच्या जन्माने त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
अनेक भूमिका गाजल्या
सतिश कौशिक यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चांगल्या भूमिका केल्या. मिस्टर इंडियापासून ते दिवाना मस्तानापर्यंतच्या त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. जाने भी दो यारो, कागज, कर्ज, जमाई राजा, साजन चले ससुराल, मिस्टर अँड मिसेस खिलाडी आदी सिनेमातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. तर हम दिल दे चुके है सनम, तेरे नाम, शादी से पहले आदी सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.