Soni Razdan: महिनाभर फोन बंद असूनही पाठवलं बिल; टाटा टेली सर्व्हिसवर आलिया भट्टच्या आईचा संताप
महिनाभर फोन सर्व्हिस बंद असूनही संपूर्ण महिन्याचा बिल पाठवला, अशी तक्रार त्यांनी केली. त्याचप्रमाणे हेल्पलाइनला कॉल केला तरी कोणीच तो फोन उचलत नसल्याचं त्यांनी म्हटलं. या ट्विट्समध्ये त्यांनी काही पुरावेसुद्धा जोडले आहेत.
अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) आई आणि निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांची पत्नी सोनी राजदान (Soni Razdan) यांनी सोशल मीडियाद्वारे ‘टाटा टेली सर्व्हिस’वर (Tata Tele service) तीव्र संताप व्यक्त केला आहे. टाटा टेलीच्या लँडलाइन सर्व्हिसबद्दल त्यांनी ट्विट्स केले आहेत. महिनाभर फोन सर्व्हिस बंद असूनही संपूर्ण महिन्याचा बिल पाठवला, अशी तक्रार त्यांनी केली. त्याचप्रमाणे हेल्पलाइनला कॉल केला तरी कोणीच तो फोन उचलत नसल्याचं त्यांनी म्हटलं. या ट्विट्समध्ये त्यांनी काही पुरावेसुद्धा जोडले आहेत. महिनाभर फोन बंदच असल्याने मी फोनचं बिल अजिबात भरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
टाटा टेलीसर्व्हिसच्या ट्विटर अकाऊंटला टॅग करत सोनी यांनी लिहिलं, ‘तुमची लँडलाइन सर्व्हिस अत्यंत बेकार आहे. माझा फोन 1 ते 24 मे दरम्यान बंदच होता. मदतीसाठी हेल्पलाइनला कॉल केला असता तोसुद्धा कोणी उचलला नाही. अखेर 10 मे रोजी आम्ही ई-मेल पाठवला. तरीसुद्धा तुम्ही मला महिन्याभराचं बिल पाठवलात. मी ते भरणार नाही.’
सोनी राजदान यांचे ट्विट्स-
@TataTeleBiz your landline service has gone down the drain. Phone was not working 1st to 24th May. No one picks up your help line so impossible to complain. We finally mailed on 10th May. Despite that you’ve charged me for a full month. I want out !
— Soni Razdan (@Soni_Razdan) June 23, 2022
दुसर्या ट्विटमध्ये सोनी यांनी त्यांचं सबस्क्रिप्शन समाप्त करण्यासाठी कंपनीला केलेल्या विनंत्यांचा पुरावा दिला. कंपनीने त्यांना पाठवलेल्या ई-मेल्सचेही स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केले, ज्यामध्ये असं लिहिलंय की सोनी यांनी बिलचे पैसे भरले नाहीत. सोनी यांनी आणि त्यांच्या टीमने टाटा टेलीला पाठवलेल्या ई-मेलचा स्क्रीनशॉटदेखील त्यांनी शेअर केला आहे, ज्यात लँडलाइन कनेक्शन बंद करण्याची विनंती केली आहे. कारण टेलिफोन काम करत नसतानाही त्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत.
सोनी राजदान यांचे ट्विट्स-
— Soni Razdan (@Soni_Razdan) June 23, 2022
कंपनीने पाठवलेल्या दुसर्या पेमेंट रिमाइंडर नोटिफिकेशनला उत्तर देताना सोनी यांनी लिहिलं, “कृपया लक्षात घ्या की माझा फोन एका महिन्यापासून काम करत नव्हता आणि म्हणून मी हे बिल भरत नाही. एक कंपनी म्हणून तुम्ही तुमचे फोन कधी काम करत नव्हते हे जाणून घेण्याची तसदी घेऊ शकत नाही आणि ग्राहकाकडून बंद असलेल्या फोनसाठी शुल्क आकारण्यास तयार असाल तर कृपया माझी सेवा बंद करा. कारण मी तुमच्या अकार्यक्षमतेला कंटाळले आहे.” सोनी यांचे हे ट्विट्स क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र त्यावर टाटा टेलीकडून अद्याप कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही.
सोनी या 2021 मध्ये नेटफ्लिक्सवरील ‘कॉल माय एजंट’ या सीरिजमध्ये झळकल्या होत्या. या एप्रिल महिन्यात त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत नव्या प्रोजेक्टची घोषणा केली.