Sonu Sood on IT Raid : सोनू सूदने 20 कोटींच्या करचुकवेगिरीचे आरोप फेटाळले, उत्तर देताना म्हणाला ‘वेळ सांगेल…’
सोनू सूदने 20 कोटी रुपयांच्या कर चोरीबद्दल बोलताना सांगितले की, हे आरोप निराधार आहेत आणि मी देशाचे कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मात्र, आयकर विभागाची चौकशी अद्याप सुरू असल्याने सोनू सूदने या विषयावर अधिक काही सांगण्यास नकार दिला.
मुंबई : लॉकडाऊन दरम्यान अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) जे नाव कमावले, त्याच्या चाहत्यांना असे वाटते की त्याच्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडे, सोनू सूदवर झालेल्या आयकर छाप्यामुळे अभिनेता काही दिवस त्याच्या घराबाहेर दिसला नाही. दरम्यान, बातमी आली की, आयकर विभागाला सोनू सूदच्या खात्यातून 20 कोटी रुपयांच्या कर चोरीचे संकेत मिळाले आहेत. मात्र, सोनू सूदने हे अहवाल सरळ फेटाळले आहेत.
एचटीला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने 20 कोटी रुपयांच्या कर चोरीबद्दल बोलताना सांगितले की, हे आरोप निराधार आहेत आणि मी देशाचे कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मात्र, आयकर विभागाची चौकशी अद्याप सुरू असल्याने सोनू सूदने या विषयावर अधिक काही सांगण्यास नकार दिला. सोनू सूदने निश्चितपणे सांगितले की, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने दिली आहेत आणि त्याने अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली कागदपत्रेही दिली आहेत.
मी कायद्याचे पालन करणारा नागरिक!
सोनू सूद आपल्या निवेदनात म्हणाला की, ‘अधिकाऱ्यांना जे हवे होते किंवा ज्याची गरज होती, आम्ही त्यांना ते सर्व दिले आणि भविष्यात त्यांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. मला माझ्या देशाच्या कायदा व्यवस्थेबद्दल खूप आदर आहे. मी या देशाच्या कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी खात्रीशीरपणे सांगतो की, जर त्यांना रात्रीच्या वेळी काही हवे असेल, तर मी ते देखील त्यांना पुरवीन.’
एवढेच नाही तर, दुसर्या निवेदनात सोनू सूदने आयकर विभागाच्या कार्यवाहीवर असेही म्हटले होते की, तुम्हाला नेहमी तुमच्या बाजूने गोष्ट सांगण्याची गरज नसते. येणारी वेळ स्वतःच सर्व सांगेल.
गेल्या बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनू सूदच्या सहा ठिकाणी छापे घातल्याची बातमी समोर आली होती. हे छापे सतत 4-5 दिवस चालू होते. आठवड्याच्या शेवटी, आयटी विभागाला त्यांच्याकडून सुमारे 20 कोटी रुपयांच्या कथित कर चोरीचा संशय आल्याची माहिती मिळाली. एवढेच नाही तर, आयकर विभागाला सोनू सूदच्या व्यावसायिक भागीदारांसोबत 240 कोटी रुपयांच्या इतर संशयास्पद सौद्यांचाही संशय आहे.
सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा?
प्राप्तिकर विभागाने सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट केली आहे. सोनू सूद हा बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतल्याचे दाखवून बेहिशेबी पैसे आपल्या बँक खात्यात वळते करायचा. आयकर विभागाने सोनू सूदच्या घरी आणि संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये यासंबंधीची कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर बुडवेगिरी केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.
परकीय चलन कायद्याचेही उल्लंघन
सोनू सूदने परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडीदरम्यान काही कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदला मोठ्याप्रमाणावर परकीय चलनाच्या स्वरुपात देणगी मिळाली होती. हे पैसे त्याने खर्च केल्याचा संशय प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.