Death Anniversary | बनायचे होते इंजिनिअर पण बनले गायक, वाचा एसपी बालसुब्रमण्यम यांचा संगीत प्रवास
ज्येष्ठ गायक एसपी बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांची आज (25 सप्टेंबर) पुण्यतिथी आहे. वर्ष 2020 मध्ये कोरोनामुळे या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायकाचे निधन झाले. बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी झाला. ते एक अष्टपैलू कलाकार होते.
मुंबई : ज्येष्ठ गायक एसपी बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांची आज (25 सप्टेंबर) पुण्यतिथी आहे. वर्ष 2020 मध्ये कोरोनामुळे या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायकाचे निधन झाले. बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी झाला. ते एक अष्टपैलू कलाकार होते. त्यांनी पाच दशकांपासून आपल्या सर्वोत्तम आवाजामुळे लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले होते. 80च्या दशकापासून ते नवीन शतकाच्या सुरूवातीपर्यंत, बालसुब्रमण्यम हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत होते.
एसपी बालसुब्रमण्यम यांनी गायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक, डबिंग कलाकार आणि चित्रपट निर्माता म्हणून काम केले आहे. त्यांनी सलमान खानच्या चित्रपटांसाठी अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांनी सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक म्हणून 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. एसपी बालसुब्रमण्यम यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. याशिवाय सलमान खान पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. तरुण असलेला सलमान आणि एस.पीं.चा परिपक्व आवाज यांचा ताळमेळ कसा बसेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र हा चित्रपट सुपरहिट झाला आणि एस.पी. बालासुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली. यानंतर एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी सलमानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली.
बनायचे होते अभियंता, पण…
एस. पी. बालासुब्रमण्यम यांना अभियंता बनायचे होते, ते त्यांचे स्वप्न होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशच्या अनंतपुर येथील जवाहरलाल टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीमध्ये प्रवेश देखील घेतला होता. मात्र याच कालावधीत ते प्रचंड आजारी पडले. आजार तसा गंभीर नव्हता. परंतु त्यातून बरे होण्यासाठी त्यांना खूप कालावधी गेला. याचमुळे त्यांना इंजिनिअरिंग सोडावी लागली.
संगीत शिक्षण मात्र सुरूच!
इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वी आणि इतर अभ्यासक्रम शिकत असताना त्यांचे संगीत शिक्षण मात्र नित्य नियमाने सुरु होते. 1964मध्ये त्यांना ‘हौशी’ गायक म्हणून त्यांना एका स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. यानंतर गायन क्षेत्रात करिअर करायचे, असे ठरवून ते पुढे जात राहिले. सुरुवातीला त्यांनी अनेक मोठ्या दक्षिणात्य संगीतकार आणि गायकांसोबत सहायक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
दक्षिणेतील ‘रफी’
याच दरम्यान त्यांनी आपल्या गायकी कलेला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणजे त्यांना पुढच्या दोन वर्षात, 1969 मध्ये म्हणजेच वयाच्या 20व्या वर्षी स्वतंत्र्यपणे गाण्याची संधी मिळाली. त्यांचे पहिले गाणे हे त्यांच्या मातृभाषेत अर्थात तेलुगुत होते. या गाण्याच्या अगदी आठ दिवसांनी त्यांनी कन्नड भाषेतील एक गाणे रेकॉर्ड केले. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना ‘दक्षिणेतील रफी’ म्हणून नावाजले जाते.
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये कोरले नाव
देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण’ पुरस्काराने एस. पी. बालासुब्रमण्यम यांना गौरवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सहा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. 8 फेब्रुवारी, 1981 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 अशा बारा तासांत तब्बल 21 कन्नड गाणी रेकॉर्ड करत त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले. या आधी त्यांनी एका दिवसांत 19 तमिळ गाणी तर, 16 हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला होता. ते इतके व्यस्त होते की, दिवसाला 15-16 गाणी ते रेकॉर्ड करतच! याशिवाय ते मोठ्या कलाकारांसाठी डबिंगही करत.
हेही वाचा :
‘लगान’मधील ‘केसरीया’ आर्थिक तंगीने बेजार, 11 वर्षांपासून बेरोजगार, औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत!