मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी ‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कलाकार सतत त्यांच्या शूटचे फोटो शेअर करत असतात. सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंहच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
अभिनेता सनी देओलने त्याच्या इंस्टाग्रामवर तारा सिंहचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या लूकने सनीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताच काही तासांतच त्याचा हा लूक व्हायरल झाला. हा फोटो शेअर करत त्याने एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने हे पात्र पुन्हा साकारल्यानंतर कसे वाटते हे सांगितले आहे.
फोटो शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फक्त काही भाग्यवानांनाच अद्भुत पात्रांना पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळते. तारा सिंह 20 वर्षांनंतर हजर आहे.’ त्याने पुढे सांगितले की, तारा सिंहचे पहिले शेड्युल पूर्ण झाले आहे. मला खूप छान वाटत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. पोस्टबद्दल सांगायचे तर, निर्मात्यांनी सनी देओलला 20 वर्षांपूर्वी तारा सिंहसारखा दिसण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.
गदरला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मुलाखतीत सांगितले होते की, संपूर्ण जगाला तारा सिंहला परत पाहायचे आहे आणि मला या व्यक्तिरेखेवर आणखी 10 चित्रपट बनवायचे आहेत. पण ‘गदर 2’ बनवणे अवघड आहे. ‘गदर 2’च्या घोषणेमुळे जबाबदारीही मोठी आहे.
‘गदर एक प्रेम कथा’ ही कथा भारताच्या फाळणीच्या वेळची होती. हा चित्रपट तारा सिंह या शीख, ट्रक ड्रायव्हरची कथा सांगतो जो, सकीना या श्रीमंत घरातील मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडतो. ‘गदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला, ज्याने त्याच्या सीक्वलकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. चित्रपटाची कथा जिथून संपली तिथून सुरू होईल. ‘गदर 2’ तारा सिंहच्या कुटुंबासोबत पुढे काय घडते, यावर आधारित आहे. चित्रपटाच्या कथेतील पात्रांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. ‘गदर’मध्ये जीतची भूमिका साकारणारा मुलगा आता मोठा झाला असून, या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याशिवाय अमिषा पटेलही सकिनाच्या भूमिकेत दिसणार आहे.