प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन, कला विश्वावर मोठी शोककळा
देशाच्या कलाविश्वावर शोककळा पसरवणारी अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तबलावादक आणि ज्येष्ठ कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद गेले. संगीत जगतातील अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. तबला मास्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. एक काळ असा होता की, झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची. प्रेक्षक त्यांची मोठमोठ्या संगीतकारांसोबतची जुगलबंदी पाहण्याचा आनंद लुटत असत. त्यांच्या तबला वादनाच्या कौशल्याने त्यांचे जगभरात चाहते होते. बॉलिवूड आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं आणि तबला वाजवला होता. ते त्यांच्या क्षेत्रातील सर्वात दिग्गज होते. संगीत विश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना 2002 मध्ये पद्म आणि 2023 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. अशा दिग्गज कलाकाराचं आज निधन झालं आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण त्यांची आता प्राणज्योत मालवल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्चा 1951 रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा हे देखील प्रसिद्ध तबलावादक होते. झाकीर हुसेन यांनी वडील अल्लारखा यांच्या पावलांवर पाऊल ठेवत संगीतालाच आपले करिअर म्हणून निवडले आणि ते आपले जीवनही बनवले. झाकीर हुसेन यांनी लहानपणापासून तबला शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडील होते, ज्यांच्याकडून शिक्षण घेऊन झाकीर हुसैन यांनी वयाच्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता.