विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. प्रदर्शनाच्या चार आठवड्यानंतरही चित्रपटाची कमाई सुरूच आहे. ‘बच्चन पांडे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘अटॅक’ या चित्रपटांसोबत स्पर्धा असतानाही ‘द काश्मीर फाईल्स’ आता 250 कोटींकडे वाटचाल करत आहे. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटावरून सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. आता अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) या चित्रपटावर व्यक्त झाली आहे. ट्विंकलने तिच्या लेखनस्तंभात या चित्रपटाचा उल्लेख केला असून त्याची खिल्ली उडवली आहे. द काश्मीर फाईल्सच्या वाढत्या क्रेझमुळे कशाप्रकारे इतर दिग्दर्शकांमध्ये चित्रपटाच्या नावाबद्दल चढाओढ सुरू आहे, याविषयी तिने उपरोधिकपणे लिहिलं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या स्तंभात ट्विंकलने लिहिलं की कशाप्रकारे इतर दिग्दर्शक आता ‘साऊथ बॉम्बे फाईल्स’, ‘अंधेरी फाईल्स’ यांसारख्या नावांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्यांनासुद्धा ‘द काश्मीर फाईल्स’सारखं यश मिळवता येईल. ‘एका निर्मात्याच्या ऑफिसमध्ये मिटींगदरम्यान मला अशी माहिती मिळाली की ‘द काश्मीर फाईल्स’नंतर आता नव्या शीर्षकांसाठी चढाओढ सुरू झाली आहे. मोठ्या शहरांवर आधीच दावा केल्यामुळे आता बिचारे लोक अंधेरी फाईल्स, खारदंडा फाईल्स, साऊथ बॉम्बे फाईल्स यांसारख्या नावांचं रेजिस्ट्रेशन करत आहेत. मी फक्त याचा विचार करतेय की मी माझे सहकारी आतासुद्धा स्वत:ला दिग्दर्शक म्हणू शकतात का? की या सर्व फाइलिंगसोबत तेसुद्धा खरे राष्ट्रवादी मनोज कुमार यांच्यासारखे क्लर्क झाले आहेत,’ असा टोला ट्विंकलने या लेखातून लगावला आहे.
ट्विंकलने पुढे उपरोधिकपणे लिहिलं की ती आता ‘नेल फाईल्स’ या नावाने चित्रपट करण्याचा विचार करतेय. यावर आई डिंपल कपाडिया यांची काय प्रतिक्रिया होती, तेसुद्धा तिने सांगितलं. ‘तुझा हा चित्रपट अत्यंत विचित्र मॅनीक्युअरवर तर आधारित नाही ना’, असं आईने विचारल्यावर मी तिला म्हटलं, “कदाचित असू शकतं. किमान सांप्रदायिक शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकण्यापेक्षा हे तरी चांगलं आहे”, असं ट्विंकलने पुढे लिहिलं.
‘द काश्मीर फाईल्स’मुळे बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ची फारशी कमाई होऊ शकली नाही. यावर बोलताना अक्षयसुद्धा मस्करीत म्हणाला होता की, “विवेकजींनी काश्मीर फाईल्स हा चित्रपट बनवून देशाचं दु:खद सत्य सर्वांसमोर मांडलं. या चित्रपटाने माझ्या चित्रपटालाही बुडवलं, ही वेगळी गोष्ट आहे.”
हेही वाचा: