अडीच तासांचा शाहरुखचा Pathaan चित्रपट युट्यूबवर लीक? नेमकं काय आहे प्रकरण
जवळपास चार वर्षांनंतर बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पठाण' (Pathan) या चित्रपटासाठी शाहरुखने खूप मेहनत घेतली असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला.
जवळपास चार वर्षांनंतर बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटासाठी शाहरुखने खूप मेहनत घेतली असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला. 2018 मध्ये ‘झिरो’नंतर शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. त्यामुळे चाहत्यांचा या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे. मात्र अशातच सोशल मीडियावर ‘पठाण’ चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये पठाण या संपूर्ण चित्रपटाची लिंक असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच शाहरुखचा अडीच तासांचा हा चित्रपट युट्यूबवर लीक झाला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. (Pathaan Full Movie Leak)
‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य आवडलं. पठाण या चित्रपटाची लिंक अधिकाधिक शेअर करा, जेणेकरून सर्वजण या लिंकद्वारे हा चित्रपट पाहू शकतील. थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाच्या तिकिटासाठी 200-300 रुपये वाया घालवण्याची वेळ येणार नाही’, असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाविषयी संसदेत वक्तव्य केलं होतं. “चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याऐवजी सरळ युट्यूबवर टाका, मग फ्रीच फ्री होऊन जाईल”, असं ते म्हणाले होते. सोशल मीडियावर अनेकांनी पठाणच्या चित्रपटाची ही लिंक शेअर केली आहे. मात्र शाहरुखचा पठाण हा चित्रपट खरंच लीक झालाय का?
काय आहे व्हायरल पोस्ट?
दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी की बात अच्छी लगी पठान मूवी का लिंक ज़्यादा से ज़्यादा शेयर करें ताकि सभी लोग यह मूवी इस लिंक से देख सकें ताकि किसी को भी थियेटर में जाकर बिन फालतू की 200-300 रुपये की टिकट खरीदने में पैसे खर्च ना करना पड़े https://t.co/GH0OcGkbol
— Rajezh Sahu राजेश साहू स्वयंसेवक【राष्ट्र प्रथम्】 (@RajeshSahu7994) March 29, 2022
जाणून घ्या सत्य-
अडीच तासाचा संपूर्ण चित्रपट संबंधित युट्यूब लिंकवर असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे खोटं आहे. व्हायरल पोस्टमधील या लिंकमध्ये खरंतर शाहरुखचा चित्रपट नसून त्याच्या जुन्या चित्रपटांमधील काही सीन्स आहेत. नेटकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी शाहरुख, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या जुन्या चित्रपटांमधील काही सीन्स एडिट करून त्यामध्ये एकत्र करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ 28 नोव्हेंबर 2021 रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आला असून त्याला चाळीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
2 तास 38 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या ‘रईस’, जॉन अब्राहमच्या ‘रॉकी हँडसम’ आणि दीपिकाच्या एका चित्रपटातील काही सीन्स आहेत. यानंतर व्हिडीओमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण, किंग खानचा झिरो चित्रपट, संगीत-दिग्दर्शक विशाल-शेखर आणि निर्माता आदित्य चोप्रा यांचा उल्लेख आहे. मात्र या संपूर्ण व्हिडीओमध्ये पठाण चित्रपटातील एकही दृश्य नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट खोटी आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या भूमिका आहेत. 2018 मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने मोठा ब्रेक घेतला असून अखेर चार वर्षांनंतर त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. यामध्ये कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माने शाहरुखसोबत काम केलं होतं.
हेही वाचा:
पतीच्या कॅन्सरविषयी बोलताना इन्स्टाग्राम LIVE दरम्यान अभिज्ञा झाली भावूक; म्हणाली..