Year Ender 2021 | कुणी ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेलं, तर कुणाचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत राहिलं! पाहा सरत्या वर्षात बॉलिवूडमध्ये काय-काय घडलं…
2021 हे वर्ष अनेक अर्थांनी लक्षात राहीलच, पण बॉलिवूडच्या वादांनी या वर्षाला एक वेगळं रूप दिलं. बॉलिवूडसाठी हे वर्ष खूपच गोंधळाचं ठरलं. ड्रग्जपासून ते भारताच्या स्वातंत्र्यवर वादग्रस्त टीका यामुळे हिंदी चित्रपटसृष्टी पुरती हादरून गेली होती. असे अनेक स्टार्स आणि स्टार किड्स आहेत, जे बऱ्याच काळापासून वादांच्या भोवऱ्यात आहेत.
मुंबई : 2021 हे वर्ष अनेक अर्थांनी लक्षात राहीलच, पण बॉलिवूडच्या वादांनी या वर्षाला एक वेगळं रूप दिलं. बॉलिवूडसाठी हे वर्ष खूपच गोंधळाचं ठरलं. ड्रग्जपासून ते भारताच्या स्वातंत्र्यवर वादग्रस्त टीका यामुळे हिंदी चित्रपटसृष्टी पुरती हादरून गेली होती. असे अनेक स्टार्स आणि स्टार किड्स आहेत, जे बऱ्याच काळापासून वादांच्या भोवऱ्यात आहेत. काही स्टार्स चुकांमुळे सतत ट्रोल होत राहिले, तर काहींना तुरुंगाची हवाही खावी लागली.
2021 वर्ष संपायला अवघ एक दिवस उरला आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा आपण नवीन वर्ष म्हणजे 2022 मध्ये प्रवेश करणार आहोत, तेव्हा मागील विवादांबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यावरून हे वर्ष बॉलिवूडसाठी किती वाईट गेले, हे देखील आपल्या लक्षात येईल.
आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी
आर्यन खानवर ड्रग्ज सेवन तसेच लपवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर शाहरुख खान देखील खूप तणावात होता. संपूर्ण बॉलिवूडमध्ये याबद्दल चर्चा सुरु होत्या. आर्थर रोड तुरुंगात 26 दिवस काढल्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला. आपल्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंगही सोडले होते.
आर्यनला या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला की, त्याला आठवड्यातून एकदा एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी यावे लागेल. या प्रकरणात आर्यनसोबतच अनन्या पांडेचेही नाव पुढे आले आहे. चॅट लीक झाल्यानंतर या प्रकरणाने बॉलिवूडची खळबळ उडाली होती.
कंगनाचे ‘स्वातंत्र्याची भिक’ वादग्रस्त वक्तव्य
कंगना रनौत नेहमीच चर्चेत असते. तिचा वादांशी सखोल संबंध आहे. नुकतेच पद्मश्री मिळाल्यानंतर कंगनाने एका मुलाखतीत म्हटले होते की, भारताला भीक मागून स्वातंत्र्य मिळाले आणि खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. या विधानामुळे कंगनावर खूप टीका झाली आणि अनेक राजकीय पक्षांच्या लोकांनी सोशल मीडियावर तिच्यावर आरोप केले आणि तिला देशद्रोही म्हटले. याशिवाय कंगनाकडून पद्मश्री परत घेण्याचीही मागणी करण्यात आली होती. कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनाही दहशतवादी म्हटले होते.
राज कुंद्रा आणि अश्लील व्हिडीओ प्रकरण
राज कुंद्रा यांचं नाव मोठं आहे, पण या वर्षात ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं. राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म बनवल्याबद्दल अनेक दिवस तुरुंगात जावे लागले होते. राज कुंद्रावर त्याच्या अॅपसाठी मॉडेल्सशी अन्यायकारक व्यवहार करून पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप होता. राज कुंद्राला 50 दिवस तुरुंगाची हवा खात काढावे लागले.
‘द फॅमिली मॅन 2’ सीरीज वादात
मनोज बाजपेयी आणि समंथा अक्किनेनी स्टारर वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये दक्षिण भारतातील लोकांना दहशतवादी दाखवण्यात आले होते, त्यानंतर या मालिकेला अँटी-तामिळ म्हटले गेले होते. या वेब सीरीजवरून बराच वादही झाला होता. सीरीजमधून हा सीन हटवण्याची मागणीही करण्यात आली आणि तामिळनाडू सरकारनेही याला कडाडून विरोध केला.
तापसी पन्नूच्या घरावर आयटीचा छापा
याच वर्षी आयकर विभागाने तापसी पन्नूच्या घरावर छापा टाकला होता. तापसीवर करचुकवेगिरीचा आरोप होता. या छाप्याबद्दल तापसीने सोशल मीडियावर सांगितले होते. फँटम फिल्म्सवरही करचुकवेगिरीचा आरोप होता. तापसीशिवाय अनुराग कश्यप आणि विकास बहल यांच्या घरावरही आयकर विभागाने छापे टाकले होते.
‘बबिता’ फेम मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोची कलाकार मुनमुन दत्ता हिच्यावर जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून तिच्या अटकेची मागणी होत आहे. हे प्रकरण इतके वाढले होते की, मुनमुन दत्ताला जाहीर माफीही मागावी लागली होती. याशिवाय त्याच शोमध्ये टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्यांवरूनही तिचं नाव चर्चेत आलं होतं.