अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवण्याची धमकी; ‘त्या’ फोननंतर मुंबई पोलिसांकडून कसून तपास
ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून फोन करणाऱ्याचा कसून शोध घेत आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर पालघरमधून हा फोन आल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई : मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करून बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या मुंबईतील घराजवळ हे बॉम्ब ठेवल्याची धमकी संबंधित व्यक्तीने दिली. या कॉलनंतर नागपूर पोलिसांनी लगेचच मुंबई पोलिसांना त्याविषयीची माहिती दिली. त्यानंतर बॉम्ब स्क्वॉडला बिग बी आणि धर्मेंद्र यांच्या घरी पाचारण करण्यात आलं. घर आणि घराजवळील परिसराची पूर्ण तपासली केली असता त्यांना काहीच सापडलं नाही.
अमिताभ बच्चन यांचं मुंबईतील घर हे पर्यटकांसाठी आणि चाहत्यांसाठी जणू प्रेक्षणीय स्थळच आहे. दर रविवारी या बंगल्याबाहेर चाहते बिग बींची एक झलक पाहण्यासाठी जमा होतात. बिग बीसुद्धा त्यांना अभिवादन करण्यासाठी बंगल्याबाहेर येतात. मुंबईतील जुहू परिसरात बिग बींचे एकूण चार बंगले आहेत. जनक, जलसा, वत्स आणि प्रतीक्षा अशी या बंगल्यांची नावं आहेत. तर धर्मेंद्र यांचा बंगलासुद्धा जुहूमध्येच आहे.
25 लोक दादर पोहोचले आहेत आणि ते हल्ल्याची प्लॅनिंग करत आहेत, अशीही धमकी त्या अज्ञात व्यक्तीने पोलिसांना दिली होती. या फोन कॉलनंतर नागपूर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्याशिवाय मुकेश अंबानी यांचंही घर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.
मुकेश अंबानींना धमकी मिळाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी ऑगस्ट 2022 मध्येही अँटिलिया बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी उभी होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं. नंतर तपासादरम्यान त्या गाडीत जिलेटिनच्या काड्या ठेवण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं.
अमिताभ बच्चन हे लवकरच ‘गणपत’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर धर्मेंद्र यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत.