अखेर ‘गंगुबाई काठियावाडी’चा विजय; हायकोर्टाने फेटाळल्या चित्रपटाविरोधातील याचिका

| Updated on: Feb 23, 2022 | 5:42 PM

Gangubai Kathiawadi: सेन्सॉर बोर्डने चित्रपटात चार बदल सुचवत 'UA' प्रमाणपत्र दिलं आहे. तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबाबतच्या दृश्यावर कात्री लावली आहे.

अखेर गंगुबाई काठियावाडीचा विजय; हायकोर्टाने फेटाळल्या चित्रपटाविरोधातील याचिका
आलिया भट
Follow us on

मुंबई उच्च न्यायालयाने संजय लीला भन्याळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाविरोधातील दोन याचिका फेटाळून लावल्या आहेत. तर चित्रपटाविरोधातील आणखी एक याचिका निकाली काढली. कामाठीपुरा (Kamathipura) या भागातील काही रहिवाश्यांनी आणि आमदार अमिन पटेल यांनी या चित्रपटाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. बुधवारी या याचिकांवरील सुनावणी पार पडली आणि त्यात या चित्रपटाला दिलासा मिळाला. चित्रपटातून कामाठीपुरा हा शब्द सेन्सॉर करावा किंवा काढून टाकावा अशी मागणी या याचिकेत केली होती. चित्रपटामुळे कामाठीपुरा परिसरात राहणाऱ्या रहिवाशांची बदनामी होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दुसरीकडे सेन्सॉर बोर्डकडून चित्रपटाला ‘UA’ प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहाचे दरवाजे खुले झाले आहेत.

लेखक एस हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील एका अध्यायावर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट गंगुबाईच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचं वर्ल्ड प्रिमिअर आयोजित करण्यात आलं होतं. हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ‘UA’ प्रमाणपत्र देताना चार बदल सुचवले आहेत. चित्रपटातील एक आक्षेपार्ह शब्द आणि १७ सेकंदांचा संवाद आणि व्हिज्युअल्सचा भाग काढून टाकण्यात आला आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतचा गंगुबाईचा संवादही काढून टाकण्यात आला आहे. या सीनमधील ४३ सेकंदांचे संवाद सेन्सॉर बोर्डाने काढण्यास सांगितले आहेत.

भन्साळींच्या ‘गंगूबाई..’मागे वादांचा ससेमिरा

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. याआधी खुद्द गंगूबाई यांच्या मुलाने देखील या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता. गंगूबाई यांचे पुत्र बाबूजी रावजी शाह यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि प्रख्यात लेखक हुसेन झैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले की, हुसेन झैदी यांच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे. बाबूजी रावजी शाह म्हणाले की, जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून स्थानिक लोकांकडून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय एका वाईट कुटुंबातील म्हणून त्यांना हिणवले जात आहे. तसेच यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.