बोनी कपूर यांचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; श्रीदेवी यांचं कनेक्शन पाहून नेटकऱ्यांनी केले कमेंट्स
निर्माते बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. 2004 आणि 2024 मधील फोटो त्यांनी कोलाज करून पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
निर्माते बोनी कपूर यांनी नुकताच सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. बोनी कपूर यांनी 2004 या वर्षातील लूक आणि आताचा लूक असा कोलाज फोटो पोस्ट केला आहे. त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. 2004 मधील फोटोमध्ये बोनी कपूर हे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत दिसून येत आहेत. तर उजव्या बाजूच्या फोटोमध्ये त्यांचा नवा लूक पहायला मिळतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी काही स्माइलचे इमोजी पोस्ट केले आहेत. बोनी कपूर यांच्या या फोटोवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांचा चुलत भाऊ आणि अभिनेते संजय कपूर यांनी लिहिलं, ‘वॉव’! तर इतरही काही सेलिब्रिटींनी त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक केलं आहे.
बोनी कपूर यांचं वजन 115 किलोवरून आता 98 किलो इतकं झालं. त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं त्यांच्या दिवंगत पत्नीशी खास कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचं दुबईतील हॉटेल रुममधील बाथटबमध्ये बुडून निधन झालं. गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले होते. श्रीदेवी यांना बऱ्याचदा मिठाशिवाय खूप कठीण डाएट फॉलो करावा लागायचा. त्यामुळे अनेकदा त्यांना चक्कर यायची, असा खुलासा त्यांनी केला होता.
बोनी कपूर यांचं ट्रान्सफॉर्मेशन
View this post on Instagram
श्रीदेवी या त्यांच्या निधनाच्या वेळीही डाएटवर होत्या, असं बोनी कपूर यांनी स्पष्ट केलं होतं. “ती अनेकदा उपाशीच राहायची. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेत चांगलं दिसण्यासाठी ती खूप प्रयत्न करायची. ऑनस्क्रीन मी कुठे जाड तर दिसत नाही ना, मी चांगली दिसतेय का याची तिला सतत काळजी असायची. लग्नानंतरही मी तिला अनेकदा तिला चक्कर येऊन पडल्याचं पाहिलंय. त्यावेळी डॉक्टर तिला हेच सांगायचे की तुला कमी रक्तदाबाचा त्रास आहे.”, असं त्यांनी पुढे सांगितलं होतं.
लग्नानंतर बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या कठीण डाएटविषयी माहिती होती. अनेकदा डिनर करतानाही त्या मिठाशिवाय जेवण जेवायच्या. हे पाहून बोनी कपूर यांनी डॉक्टरांकडेही विनंती केली होती. श्रीदेवी यांना जेवणात थोडंफार प्रमाणात मीठ खाण्याचा सल्ला द्या, असं ते डॉक्टरांना सांगायचे. “दुर्दैवाने तिने याकडे फार गांभीर्याने पाहिलं नव्हतं. तिच्या निधनाची घटना घडेपर्यंत डाएट हा विषय इतका गंभीर असू शकतो याचा मीसुद्धा विचार केला नव्हता”, अशी कबुली बोनी कपूर यांनी दिली होती.