‘कलाकाराला तिकीट विक्रीपासून रोखू..’; कुणाल कामराच्या पत्रानंतर ‘बुक माय शो’चं उत्तर
कुणाल कामराने त्याच्या इन्स्टाग्रामद्वारे 'बुक माय शो'ला खुलं पत्र लिहिलं आहे. त्यावर आता कंपनीकडून उत्तर देण्यात आलं आहे. कोणते कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजक घेतात असं बुक माय शोने स्पष्ट केलंय.

कॉमेडियन कुणाल कामराने सोमवारी ‘बुक माय शो’ला (BookMyShow) पत्र पाठवून यादीतून काढू नये (डिलीस्ट करू नये) आणि आपला कार्यक्रम किती जणांनी पाहिला, किती उत्पन्न मिळालं याची माहिती द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर “आम्ही केवळ तिकिट विक्रीचं माध्यम आहोत. कोणते कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजक घेतात”, असं उत्तर कंपनीकडून देण्यात आलं. आपल्या भूमिकेबद्दल सार्वजनिक पातळीवर चुकीची माहिती दिली जात आहे, असंही ‘बुक माय शो’ने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
“आमच्या व्यासपीठावरून आम्ही कोणत्याही कलाकाराला त्यांच्या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीपासून रोखू शकत नाही. कोणत्याही कार्यक्रमातील आशय ही संबंधित कलाकार आणि आयोजकांची जबाबदारी असते, आमची नाही”, असंही ‘बुक माय शो’ने स्पष्ट केलंय. विविध धार्मिक श्रद्धा असलेल्या नागरिकांना एकत्र आणणं हा आमचा उद्देश असल्याचं कंपनीनं म्हटलंय. निष्पक्षपातीपणे आम्ही व्यवसाय करतो आणि देशाच्या कायद्याला बांधिल आहोत, असंही त्यांनी लिहिलं आहे.




कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कामराविरोधात मोहीम उघडली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाच्या एका नेत्याने ‘बुक माय शो’वरून कामराचे कार्यक्रम हटविल्याचा दावा केला होता. त्यानंतर कामराने ‘बुक माय शो’ला सोशल मीडियावर खुलं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर ‘बुक माय शो’ने आपल्या भूमिकेबद्दल खुलासा करत अशा प्रकारे कार्यक्रम हटविण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं.
⚠️ Official Statement pic.twitter.com/iXVSRmBISt
— BookMyShow (@bookmyshow) April 7, 2025
कुणाल कामराचं ‘बुक माय शो’ला खुलं पत्र-
‘प्रिय बुक माय शो.. मला अजूनही माहीत नाही की माझ्यासाठी तुमचा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे की नाही. या पोस्टमध्ये मी माझे नम्र विचार मांडतोय. प्रेक्षकांसाठी मी बहिष्कारांचा किंवा खाजगी व्यवसायाचं रेटिंग कमी करण्याचा चाहता नाही. बुक माय शोच्या व्यवसायासाठी जे सर्वोत्तम आहे, ते करण्याचा त्यांचा अधिकार आहे’, असं कॅप्शन लिहित कुणालने ही पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
‘प्रिय बुक माय शो, मला समजतंय की तुम्हाला राज्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याची गरज आहे आणि मला माहीत आहे की मुंबई हे लाइव्ह इंटरटेन्मेंटसाठी एक प्रमुख केंद्र आहे. राज्याच्या सहकार्याशिवाय, कोल्डप्ले आणि गन्स एन रोझेस यांसारखे प्रतिष्ठित शो शक्य झाले नसते. परंतु हा मुद्दा तुम्ही मला यादीतून काढून टाकू शकता किंवा टाकणार नाही याबद्दलचा नाही. हा मुद्दा आमच्या शोची यादी करण्याच्या तुमच्या विशेष अधिकाराबद्दलचा आहे. कलाकारांना त्यांच्या स्वत:च्या वेबसाइटद्वारे त्यांचे शो सूचीबद्ध करण्याची परवानगी न देऊन तुम्ही 2017 ते 2025 पर्यंत मी ज्या प्रेक्षकांसाठी परफॉर्म केलं, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापासून मला प्रभावीपणे रोखलं आहे’, असं त्याने या पत्रात म्हटलंय. ‘मला यादीतून काढून टाकू नका किंवा तुमच्या प्लॅटफॉर्मवरून माझ्या प्रेक्षकांकडून मी तयार केलेला डेटा (संपर्क माहिती) मला द्या’, अशी मागणी त्याने या पोस्टद्वारे केली.