“जे घडलं ते सगळं दाखवण्याची हिंमत असेल तरच..”; ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा आक्षेप
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'फुले' या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट एकतर्फी नसावा, असं ते म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे त्याकाळी ब्राह्मण महासंघाने केलेली मदतही चित्रपटात दाखवा, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेश असावा, अशी मागणी दवेंनी केली आहे. त्याकाळी ब्राह्मण समाजानं केलेली मदतही चित्रपटात दाखवा, असं ते म्हणाले. चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो, अशी शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे. ‘फुले’ हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे. यामध्ये ‘स्कॅम 1992’ वेब सीरिज फेम प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.
याविषयी आनंद दवे म्हणाले, “शाळेसाठी जागा देणारे भिडे असो, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वत:ची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोकं असो.. असं अनेकांनी सहकार्यसुद्धा केलंय. मग तुम्ही ते दाखवणार आहात का किंवा ते दाखवलं आहे का, असा माझा सवाल आहे. हा चित्रपट एकतर्फी नसावा. अनंत महादेवन हे दिग्गज दिग्दर्शक आहेत, त्यांच्याकडून अशी गल्लत झाली नाही ना? आम्ही काल निर्मात्यांशीही बोललो. आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत कळवतो की काय करता येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. आताचं महाराष्ट्रातील राजकारण खूप जातीयवादी झाल्याने या चित्रपटातून पुन्हा एकदा जातीय द्वेष पसरू नये, अशी आमची भूमिका आहे. जे जे घडलं असेल, ते सगळं दाखवण्याची हिंमत असेल तरच हा चित्रपट काढावा. आमचा या चित्रपटाला वैचारिक विरोध नाही.”
टीव्ही 9 च्या या बातमीनंतर ‘फुले’ चित्रपटाचे वितरक उमेश बंसल यांनी आनंद दवे यांना फोन केला. “तुमचा काही दृश्यांवर आक्षेप असेल तर त्याचा आम्ही विचार करू,” असं आनंद दवे यांना सांगण्यात आलं. त्याचबरोबर चित्रपट एकांगी होणार नाही याची देखील काळजी घेऊ, असं आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे.




महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जाति निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही, तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे.