स्टेजवर परफॉर्म करताना अचानक कोसळला 30 वर्षीय गायक; जागीच मृत्यू

| Updated on: Dec 15, 2023 | 1:08 PM

हृदयविकाराचा झटका हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे. एकीकडे अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर आता एका गायकाची बातमी समोर येत आहे. स्टेजवर परफॉर्म करताना हा गायक कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

स्टेजवर परफॉर्म करताना अचानक कोसळला 30 वर्षीय गायक; जागीच मृत्यू
Singer Pedro Henrique
Image Credit source: Instagram
Follow us on

ब्राझील : 15 डिसेंबर 2023 | बुधवारी ब्राझीलमध्ये अशी घटना घडली, ज्या घटनेनं लोकांना मोठा धक्का बसला. ब्राझीलचा गॉस्पल सिंगर पेड्रो हेनरिकचा परफॉर्मन्सदरम्यान मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. पेड्रो बुधवारी ब्राझीलच्या एका धार्मिक कार्यक्रमात परफॉर्म करत होता. गाणं गात आणि प्रेक्षकांसोबत संवाद साधत तो अत्यंत दमदार पद्धतीने परफॉर्म करत होता. मात्र परफॉर्म करतानाच अचानक तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. ही संपूर्ण घटना व्हिडीओत कैद झाली आहे.

या व्हिडीओमध्ये पेड्रो हेनरिक हा स्टेजच्या एका कोपऱ्यावर उभा राहून गाणं गाताना दिसून येत आहे. गाणं गाताना तो प्रेक्षकांसोबत मजा-मस्तीही करतोय. पेड्रोच्या गायकीचा आनंद तिथे उपस्थित असलेले प्रेक्षकसुद्धा घेत होते. गाणं गाताना अचानक तो क्षणभर थांबतो आणि तितक्यात त्याचा तोल ढासळतो. पेड्रो स्टेजवरून कोसळून खाली पडतो. हे सर्व इतकं अचानक घडतं की तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक आणि स्टेजवरील गिटारिस्ट या सर्वांनाच मोठा धक्का बसतो.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

स्टेजवरून कोसळल्यानंतर पेड्रो हेनरिकला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. पेड्रोने स्टेजवर परफॉर्म करण्याआधी त्याच्या मित्राला सांगितलं होतं की, तो खूप दमला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याने आपले प्राण गमावले. पेड्रोच्या पश्चात पत्नी सुइलान बरेटो आणि मुलगी झो असा परिवार आहे. त्याच्या मुलीचा जन्म 19 ऑक्टोबर रोजी झाला होता.

पेड्रोने तीन वर्षांचा असतानाच गायनाची सुरुवात केली होती. 2015 मध्ये युट्यूबवर बरेच व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याच्या व्यावसायिक करिअरला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्याने एका लोकल बँडमध्ये सहभाग घेतला. 2019 पर्यंत त्या बँडसोबत परफॉर्म केल्यानंतर हेनरिकने वैयक्तिक करिअरची सुरुवात केली. गुरुवारी तो त्याच्या युट्यूब चॅनलवर एका नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार होता.