गरीब कुटुंबात जन्म, नाईलाजाने बनली हिरोइन; ‘या’ सुपरस्टार अभिनेत्रीचे डाकूसुद्धा होते चाहते
लिव्हर सिरोसिसमुळे या अभिनेत्रीने आपले प्राण गमावले. त्यावेळी त्या 38 वर्षांच्या होत्या. रुग्णालयात जेव्हा त्या अखेरच्या घटका मोजत होत्या, तेव्हा "आपा, मला मरायचं नाही" असं त्या म्हणाल्या होत्या.
मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. यापैकी काही सेलिब्रिटींना ओळखण्याचं आव्हान दिलं जातं. अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी विशेष ओळखली जायची. तिच्या अभिनयाचाही मोठा चाहतावर्ग होता. फोटोत दिसणारी ही चिमुकली जेव्हा मोठी झाली आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हा तिच्या सौंदर्यावर डाकूसुद्धा फिदा झाले. तर मग ओळखलंत का या अभिनेत्रीला?
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मीना कुमारी आहे. मीना कुमारी यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. 1 ऑगस्ट 1972 रोजी जन्मलेल्या मीना यांचं खरं नाव महजबीं असं होतं. त्यांना अभिनेत्री बनायचं नव्हतं. मात्र त्या चार वर्षांच्या असताना वडिलांनी त्यांना कॅमेरासमोर उभं केलं. त्यावेळी मीना कुमारी या बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये झळकल्या होत्या. त्यांचं प्रोफेशनल आयुष्य जितकं यशस्वी होतं, तितकंच त्यांचं खासगी जीवन निराशाजनक होतं. चित्रपट दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी लग्न केल्यानंतरही मीना यांना कधीच खरं प्रेम मिळालं नाही.
मीना कुमारी एक चांगल्या अभिनेत्री तर होत्याच, पण त्या खूप उत्तम नर्तिकासुद्धा होत्या. त्यांनी बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं. मात्र त्यांच्या आयुष्यात एक अशी वेळ आली होती, जेव्हा त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. इतकंच नाही तर त्या अभिनेत्री मुमताज यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेल्या होत्या.
मुमताज यांनी मीना कुमारी यांना वाईट काळात खूप मदत केली होती. मात्र, मीना कुमारी यांनी हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या नावावर आलिशान बंगला दिला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, मुमताजने मीना कुमारी यांच्या ‘गोमती के किनरे’ या चित्रपटात काम केलं होतं. पण, मीना कुमारी यांची प्रकृती खालावल्याने त्या मुमताज यांना मानधन देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर तीन लाख रुपयांचं कर्ज झालं होतं.
मीना कुमारी यांनी ‘बैजू बावरा’, ‘पाकिजा’, ‘साहिब बीवी और गुलाम’, ‘फूल और पत्थर’, ‘दिल एक मंदिर’, ‘काजल’, ‘मैं चुप रहूँगी’, ‘दिल अपना प्रीत पराई’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं. 38 व्या वर्षापर्यंत त्यांनी 90 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं.