मुंबई : अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वी ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अभिनेत्याला धमकीचा मेल आल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना देखील सतर्क राहण्यास सांगितलं होतं. अशात मुंबई पोलिसांनी सलमान खान याला जीवे मारण्याचा ईमेल पाठवणाऱ्याला अटक केली आहे. आरोपी धाकड राम बिश्नोई याच्या विरोधात राजस्थानमध्ये ६ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण तेव्हा धाकड राम बिश्नोई याची जामिनावर सुटका झाली होती. पण आता सलमान खान याला धमकीचा ई-मेल पाठवल्यामुळे धाकड राम बिश्नोई वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
सलमान खान याच्या आधी सिद्धू मूसेवाला याच्या कुटुंबियांना देखील धाकड राम बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर धाकड राम बिश्नोई याच्यावर एक तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या तपासानंतर धाकड राम बिश्नोई याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात धाकड राम बिश्नोई याचा लॉरेन्स बिश्नोई याच्यासोबत कोणतंही कनेक्शन नसल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे धाकड राम बिश्नोई याला वांद्रे न्यायालयात पोलीस हजर केल्यानंतर याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कारण या धमकीच्या ईमेल अगोदर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने जेलमधून एका मुलाखती वेळी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मुंबई पोलिसांनी वाढ केली. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याला Y + दर्जाची सुरक्षा दिली आहे.
एवढंच नाही तर पोलिसांनी सलमान याला कोणत्याही कार्यक्रम सहभागी न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय खान कुटुंबियांनी देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. एवढंच नाही तर, विनाकारण खान कुटुंबाला घराबाहेर पडण्यास देखील बंदी घातली आहे.
लॉरेंस बिश्नोई याने याआधी देखील एका व्हिडीओमध्ये सलमान खान याला धमकी दिली होती. लॉरेंस बिश्नोई याने अनेकदा सलमानला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून सलमानच्या पूर्ण कुटुंबाला सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
सलमानच्या मित्राने सांगितलं, “सलमान याच्या मते धमकी आणि धमकी देणाऱ्यावर आपण अधिक लक्ष देतोय असं त्याला वाटत आहे. यामुळे आपला प्लॅन यशस्वी ठरला असं त्याला वाटेल. मात्र सलमान खान निडर आहे. ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या असतात, त्या तेव्हा घडतात, असं त्याचं म्हणणं आहे. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे तो सर्व गोष्टींचं पालन करतोय.’