पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर; गाडी डिव्हाइडरला धडकली अन्..
अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींचा रस्ते अपघातात निधन झालं. तर या अपघातात त्यांची बहीण गंभीर जखमी झाली. सध्या बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
झारखंडमधील निरसा इथल्या ग्रँड ट्रंक रोडवरजवळ झालेल्या भयानक अपघातात अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींनी आपले प्राण गमावले. या अपघातात त्यांची बहीण गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. शनिवारी संध्याकाळी 4.30 वाजता दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग 2 वर निरसा बाजार याठिकाणी हा अपघात झाला होता. हा अपघात किती भीषण होता, ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहायला मिळतंय. चौकाजवळ कार दुभाजकाला अत्यंत वेगाने धडकते. यावरूनच अपघाताची तीव्रता स्पष्ट होतेय. या अपघातात राजेश तिवारी यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी सरिता तिवारी या गंभीर जखमी झाल्या.
राजेश हे भारतीय रेल्वेत काम करत होते. बिहारमधील गोपालगंज इथल्या कमलपूरमधून ते कामाच्या ठिकाणी जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांना तातडीने धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पीटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंकज त्रिपाठी यांची बहीण सरिता तिवारी यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू असून त्या सर्जिकल आयसीयूमध्ये आहेत. या अपघातात त्यांनी बरीच दुखापत झाली असल्याचं कळतंय.
पहा अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज-
Actor Pankaj Tripathi’s brother-in-law Rakesh Tiwari died in a road accident. Pankaj Tripathi’s sister was injured in this accident.
According to the police, the accident occurred on the Delhi-Kolkata National Highway-2 at Nirsa Bazaar when Pankaj Tripathi’s brother-in-law’s car… pic.twitter.com/ZTqJCZrxz5
— Angry Saffron (@AngrySaffron) April 21, 2024
पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या बहिणीच्या अपघाताची बातमी समोर येताच अनेकांनी सोशल मीडियाद्वारे काळजी व्यक्त केली आहे. शनिवारी पंकज त्रिपाठी आणि त्यांचे भावोजी राजेश तिवारी हे एकत्रच गोपालगंज इथून निघाले होते. तिथून एका गाडीतून भावोजी राजेश हे धनबादहून चित्तरंजन याठिकाणी निघाले. तर दुसऱ्या गाडीतून पंकज त्रिपाठी पाटणा पोहोचून तिथून विमानाने मुंबईसाठी निघाले. मुंबई पोहोचताच त्यांना त्यांच्या भावोजींच्या गाडीच्या अपघाताची माहिती मिळाली होती.