लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेया बुगडेचं आवाहन
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चार मतदारसंघासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडे आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी खास आवाहन केलं आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चार मतदारसंघासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या राष्ट्रीय महोत्सवात अधिकाधिक संख्येने मतदारांनी आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन अभिनेत्री श्रेया बुगडेनं केलं आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभिनेत्री श्रेया बुगडेनं मतदारांना मतदानाचं आवाहन केलं आहे.
“मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा महोत्सव आहे. मतदान प्रक्रियेत आपण सर्वांनी सहभागी होणं आवश्यक आहे. मी मतदान करणार आहे. तुम्हीही करावं,” असं आवाहन श्रेयाने केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नव्या मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रबोधनपर कार्यक्रम राबविले जात आहेत.
नव मतदारांची नावं मतदार यादीत नसल्यास त्यांनी तातडीने नाव नोंदवावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने केलं आहे. मतदान करणे आपला केवळ अधिकारच नाही, तर आपली जबाबदारी असल्याचंही त्याने म्हटलंय. “मी मतदान करणार असून, मतदारांनीही आवर्जून मतदान करावं,” असं आवाहन आमिर खानने मतदारांना केलंय.
लोकसभेसाठी मुंबईत 20 मे रोजी मतदान आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने यंत्रणा कामाला लागली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदार संख्या, मतदान केंद्रे, विधानसभा मतदारसंघनिहाय विविध आकडेवारी यांची माहिती तयार केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई (वायव्य), उत्तर-पूर्व मुंबई (ईशान्य) आणि उत्तर मध्य मुंबई या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यांमध्ये एकूण 24 विधानसभा मतदारसंघ आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यात तब्बल एक लाख एक हजार 673 हे 85 वर्षांहून अधिक वयाचे मतदार आहेत. 14 हजार 113 हे दिव्यांग आणि परदेशात वास्तव्यास असलेले एक हजार 638 मतदार आहेत. याशिवाय संरक्षण दलात कार्यरत मतदारांची संख्या एक हजार 72 आहे.