रजनीकांत यांच्या घराला पुराचा फटका; व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क!
मिचौंग वादलाचा फटका बसलेल्या भागात वादळ आणि पूरबाधित लोकांना मदत करण्यासाठी प्रशासनाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. अधिकारी आणि कर्मचारी तिथ तैनात असून परिस्थिती पूर्ववत आणि सामान्य होईपर्यंत मदतकार्य सुरू राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
चेन्नई : 8 डिसेंबर 2023 | मिचौंग चक्रीवादळाने तमिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे चेन्नईत पूरस्थिती निर्माण झाली. शहराच्या सखल भागांत पाणी साचलं. वादळामुळे चेन्नईतील अनेक घरांना फटका बसला. मिचौंग चक्रीवादळ तमिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर मंगळवारी धडकलं. त्यामुळे चेन्नई आणि लगतच्या जिल्ह्यांना सोमवारपासूनच मुसळधार पावसाने तडाखा दिला. या वादळाचा फटका सुपरस्टार रजनीकांत यांच्याही घराला बसला आहे. चेन्नईतील पोएस गार्डन परिसरात असलेल्या रजनीकांत यांच्या घरात आणि आजूबाजूला पाणी भरलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांच्या घराजवळ संपूर्ण पाणी साचल्याचं दिसून येत आहे. घरासमोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं त्यात दिसतंय. वादळाच्या वेळी रजनीकांत आणि त्यांचे कुटुंबीय चेन्नईमध्ये नव्हते. एका चाहत्याने हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत हे सध्या चेन्नईबाहेर त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. ‘थलाइवर 170’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते बाहेर होते.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानदेखील चेन्नईच्या पुरात अडकला होता. अभिनेता विष्णू विशाल याने चेन्नई अग्निशमन दलाने केलेल्या त्याच्या बचावाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये आमिर खानला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशाल किंवा आमिरने त्याबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी आमिरचं विशालच्याच इमारतीत वास्तव्य होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचीही पुरातून सुटका करण्यात आली.
पहा व्हिडीओ
Poes Garden near @rajinikanth house @Savukkumedia @SavukkuOfficial #ChennaiFloods2023 #ChennaiRains2023 #chennaicyclone #சென்னையை_மீட்ட_திமுக pic.twitter.com/tHiYTrFsW2
— Abdul Muthaleef (@MuthaleefAbdul) December 6, 2023
मिचौंग चक्रीवादळाचा चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या वादळानंतर दोन दिवसांनीही स्थानिक रहिवाशांना तुंबलेल्या पाण्याचा तसंच खंडित वीजपुरवण्याला तोंड द्यावं लागतंय. चक्रीवादळात झालेल्या अतिवृष्टीने वेलच्चेरी, तांबरमसह अनेक भागात पाणी साचलं होतं. जलमय झालेल्या भागातील पूरग्रस्त रहिवासी आपली घरं सोडून सुरक्षित स्थळी जात आहेत. अनेक पूरबाधितांनी स्थलांतरासाठी अधिक नौका पाठवण्याची आणि अन्य मदतीची विनंती केली.