सुशांतच्या ‘छिछोरे’मधील ‘ॲसिड’ची भूमिका साकारलेल्या नवीन पोलिशेट्टीचा अपघात
सुशांत सिंह राजपूतच्या 'छिछोरे' या चित्रपटात ॲसिडची भूमिका साकारणारा अभिनेता नवीन पोलिशेट्टी याचा अपघात झाला आहे. अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेताना त्याचा अपघात झाला असून तिथल्यात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक नवीन पोलिशेट्टीबाबत महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटात भूमिका साकारलेल्या नवीनचा अपघात झाला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. नवीनच्या टीमने याबद्दलची माहिती दिली आहे. अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या नवीनचा तिथे दुचाकीवरून अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या हाताला जबर मार लागला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डल्लास याठिकाणी बाईकवरून जाताना नवीनचा हा अपघात झाल्याची माहिती त्याच्या टीमने दिली.
“डल्लासमध्ये नवीन त्याच्या बाईकवरून फिरत होता. त्यावेळी अचानक त्याचं नियंत्रण सुटलं आणि बाईक घसरली. या अपघातात त्याचा हात मोडला आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी झाली, मात्र आम्हाला त्याविषयीची माहिती नुकतीच मिळाली आहे. नवीनचा हात फ्रॅक्चर झाला असून अमेरिकेतच त्याच्यावर उपचार सुरू आहेत”, असं त्याच्या टीमने सांगितलं आहे. नवीनने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटात ॲसिड या नावाची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटात त्याने सुशांत आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत काम केलं.
View this post on Instagram
गेल्या वर्षी नवीनचा ‘मिस शेट्टी मिस्टर पोलिशेट्टी’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. महेश बाबू पचिगोला दिग्दर्शित या चित्रपटात दोन एनआरआयची कथा दाखवण्यात आली होती. यामध्ये नवीनसोबत अनुष्का शेट्टीने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 46 कोटी रुपये कमावले होते. नवीन पोलिशेट्टीचा ‘अनगानगा ओका राजू’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. कल्याण शंकर दिग्दर्शित या चित्रपटात तो श्रीलीलासोबत काम करणार आहे.