मुंबई : मराठी बालकलाकार साईशा भोईरने ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र आठ वर्षांची साईशा सध्या तिच्या आईच्या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. साईशाची आई पूजा भोईरला पैशांच्या हेरगिरीप्रकरणी मे महिन्यात अटक करण्यात आली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. यामुळे साईशाच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत नेमकं काय घडलं, ते सविस्तर जाणून घेऊयात..
मे 2023 मध्ये कफ परेड पोलिसांनी साईशाची आई पूजा भोईरला अटक केली. एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आणि त्यांच्या पत्नीची 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर होता. पूजाने दोघांना तिच्या कंपनीत पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला होता आणि त्याबदल्यात त्यांना दर आठवड्याला 10.10 टक्के नफा कमावून देण्याचं आश्वासन दिलं होतं. गुंतवलेले पैसे आणि नफा देण्यास अपयशी ठरल्यानंतर त्यांनी पूजाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
शैक्षणिक संस्थेचे संचालक आणि त्यांच्या पत्नीने पूजाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर अनेकांनी समोर येत आरोप केले. साईशा आणि तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत पूजाने जवळपास तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
साईशाच्या आईसोबतच तिचे वडील विशांतविरोधातही नाशिकमधल्या काही लोकांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली. तेव्हापासून विशांत फरार आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी नुकतीच साईशाची आई पूजा भोईर आणि वडील विशांत भोईर यांची संपत्ती जप्त केली आहे. कार, बँक अकाऊंट्स आणि साईशाच्या खात्यांशी संबंधित बचत रक्कम यांसह इतर मालमत्तदेखील शोधून जप्त करण्यात आल्या आहेत.
या सर्व घडामोडींनंतर साईशाने नुकतीच ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिकादेखील सोडली. साईशाच्या कुटुंबीयांनी तिच्याबाबत हा निर्णय घेतल्याचं कळतंय. साईशा सध्या तिच्या आजी-आजोबांसोबत राहत आहे. आधी तिची आई तिला सेटवर नेऊन सोडायची आणि तिला घेऊन यायची. मात्र आजी-आजोबांना हे सर्व करणं शक्य नसल्याने साईशाने मालिका सोडली आहे.
पोलिसांनी नुकतीच साईशाच्या कल्याणमधील घराची झाडाझडती घेतली असून त्यात त्यांना पूजाचे आर्थिक व्यवहास आणि बँक खाती संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. पोलिसांना गहाण ठेवलेल्या पूजाच्या दागिन्यांच्या पावत्या आणि कागदपत्रेही सापडली आहेत.