गायिकेने जाणूनबुजून स्वत:ला केलं कोविड पॉझिटिव्ह; भडकले नेटकरी, अखेर मागावी लागली माफी
कहरच! प्रसिद्ध गायिका जाणूनबुजून झाली कोरोना पॉझिटिव्ह; कोविडची लागण झालेल्यांच्या घरी गेली अन्..
चीन: चीनसह अन्य देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होतोय. चीनमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चिनी गायिका जेन झांगने जाणूनबुजून स्वत:ला कोरोनाबाधित करून घेतलंय. हे वृत्त समोर येताच नेटकरी संबंधित गायिकेवर भडकले आहेत.
जेन झांगने सोशल मीडियाद्वारे स्वत:ला जाणूनबुजून कोरोनाबाधिक करून घेतल्याचा खुलास केला. ज्याठिकाणी कोरोनाबाधित लोक होते, त्या घरात ती गेली होती. त्यानंतर तिला डोकेदुखी, ताप आणि घसा दुखणे अशी कोरोना व्हायरसची सामान्य लक्षणं दिसू लागली. मात्र एका दिवसानंतर ती लगेच ठीकसुद्धा झाली. लोकांना जेव्हा याबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर गायिकेनं सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट हटवत माफी मागितली.
View this post on Instagram
जेन झांगने सांगितलं की ती नवीन वर्षांच्या संध्याकाळी होणाऱ्या म्युझिक प्रोग्रामसाठी तयारी करत होती. त्यामुळे तिला स्वत:ला कोरोनाबाधित व्हायचं होतं. जेणेकरून डिसेंबरच्या अखेरपर्यंत कोरोनामुळे तिच्या म्युझिक कार्यक्रमात कोणतीही अडचण येऊ नये. जेन ही चिनी संगीतविश्वात लोकप्रिय आहे. तिथली ती यशस्वी गायिका मानली जाते. मात्र स्वत:ला कोरोनाबाधित करून घेण्याच्या या निर्णयामुळे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत.
चीनसह अन्य देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारताचीही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर, लसीकरण पूर्ण करण्यासोबतच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्र सरकारने बुधवारी राज्यांना दिला. चीनमध्ये मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.7’ या व्हेरिएंटचे भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओदिशामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.