‘व्हर्जिन मुलगी भेटणं कठीण..’; कंडोम विक्रीच्या पोस्टवर भडकली प्रसिद्ध गायिका
नवीन वर्षानिमित्त लाखोंची कंडोम विक्री झाल्याचा संदर्भ देत एका युजरने महिलांवर निशाणा साधला. लग्नासाठी व्हर्जिन मुलगी शोधणाऱ्यांना शुभेच्छा.. असं त्याने खोचकपणे लिहिलं. त्यावर आता प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. तिने गुरुवारी एका सोशल मीडिया युजरला चांगलंच सुनावलं. यामागचं कारण म्हणजे, संबंधित युजरने लाखोंच्या संख्येनं कंडोमच्या विक्रीवर नाराजी व्यक्त केली होती. हल्लीच्या पिढीत व्हर्जिन मुली भेटणंच कठीण झाल्याचं, त्याने लिहिलं होतं. या ट्विटवरून चिन्मयी श्रीपदा भडकली आणि तिने युजरला सुनावत म्हटलं, “तुझ्या आसपासच्या पुरुषांना सांग की लग्नाआधी सेक्स करू नका.” यावेळी तिने फक्त महिलांवर लागू होणाऱ्या नियमांच्या दुटप्पीपणाकडेही लक्ष वेधलं.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी एका एक्स (ट्विटर) युजरने लिहिलं, ‘ब्लिंकिटच्या सीईओने आताच पोस्ट केलंय की काल रात्री कंडोमचे 1.2 लाख पार्सल डिलिव्हर करण्यात आले. हा आकडा फक्त काल रात्रीचा आणि फक्त ब्लिंकिटवरचा आहे. इतर ई-कॉमर्स साइट्स आणि मार्केट्समध्ये कंडोमची विक्री दशलक्षांमध्ये झाली असेल. या पिढीत लग्नासाठी व्हर्जिन मुलगी शोधणाऱ्यांना शुभेच्छा.’
या पोस्टवरून युजरला सुनावत चिन्मयी श्रीपदाने लिहिलं, ‘मग पुरुषांनी लग्नाच्या आधीच स्त्रियांसोबत सेक्स करू नये. जोपर्यंत पुरुष शेळ्या, कुत्रे आणि सरपटणारे प्राणी यांच्याशी संभोग करत नसतील. महिलांना व्हर्जिन या शब्दाचं वेड नाही. पुरुष हे तसेही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात असं महिलांना वाटतं आणि तुम्हा सर्वांनी सुरक्षित किंवा असुरक्षित सेक्स केलंय का हे विचारण्याची हिंमतसुद्धा ते करत नाहीत. असो.. काही incel (ऑनलाइन कम्युनिटीचे असे सदस्य जे स्वत:ला लैंगिकदृष्ट्या स्त्रियांना आकर्षित करण्यास सक्षम सजमत नाहीत/ विशेषत: लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिला आणि पुरुषांबद्दल प्रतिकूल असलेल्या विचारांशी संबंधित) बंधूंना असं वाटतं की त्यांनी एखाद्या महिलेशी सेक्स करून तिला कायमचं दूषित केलंय. त्यामुळे पुरुषांना असा काही आजार असलाच पाहिजे ज्यातून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारी स्त्री कधीही बरी होऊ शकत नाही आणि ज्यापासून इतर पुरुष घाबरतील.’
चिन्मयी श्रीपदाने काही वेळानंतर तिची ही पोस्ट डिलिट केली. मात्र त्याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.