समंथाच्या आजाराविषयी माहिती मिळताच चिरंजीवी यांची खास पोस्ट; दिला मोलाचा सल्ला
मेगास्टार चिरंजीवी यांनी दिला समंथाला आधार; म्हणाले..
मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला ‘मायोसिटिस’ या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं आहे. रविवारी समंथाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. समंथा सध्या परदेशी त्या आजारावर उपचार घेत आहे. त्यातून बरी झाल्यानंतर ती चाहत्यांना आजाराविषयीची माहिती देणार होती. मात्र बरं होण्यास आणखी काही काळ लागणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मेगास्टार चिरंजीवी यांनीसुद्धा ट्विटरवर समंथासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
चिरंजीवी यांची पोस्ट-
‘प्रिय सॅम (समंथा), वेळोवेळी आपल्या आयुष्यात आव्हानं येतात. कदाचित आपल्याला स्वत:मधील शक्ती शोधून काढता यावी याचसाठी ते आपल्या आयुष्यात येतात. तू खूप चांगली मुलगी आहेस आणि तुझ्यातील शक्ती ही त्याहूनही खूप मोठी आहे. मला खात्री आहे की तू या आव्हानावरही लवकरच मात करशील. तुझ्या धैर्यासाठी आणि दृढनिश्चयासाठी शुभेच्छा. शक्ती नेहमीच तुझ्या पाठिशी असू दे’, अशी पोस्ट चिरंजीवी यांनी लिहिली. तू लवकरात लवकर बरी व्हावी हीच इच्छा, असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट ट्विटरवर लिहिली. या पोस्टद्वारे चिरंजीवी यांनी समंथाला खचून न जाण्याचा सल्ला दिला आहे.
Wishing you speedy recovery!!@Samanthaprabhu2 pic.twitter.com/ZWGUv767VD
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) October 30, 2022
समंथाने चिरंजीवी यांच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. ‘या प्रेमळ आणि प्रेरणादायी शब्दांसाठी धन्यवाद सर’, असं तिने लिहिलं. दुलकर सलमान, ज्युनियर एनटीआर, लक्ष्मी मंचू, श्रीया सरन आणि हंसिका मोटवानी यांनीसुद्धा कमेंट करत समंथाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
मायोसिटिस म्हणजे काय?
मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये जळजळ होते. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.