Dinesh Phadnis Death : ‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स याचं निधन, कलाविश्वावर शोककळा
Dinesh Phadnis Death : 'सीआयडी' फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं निधन... वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
मुंबई | 5 डिसेंबर 2023 : ‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं निधन झालं आहे… वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. दिनेश याच्या निधनामुळे कलाविश्व आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपूसन दिनेश याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारा दरम्यान दिनेश याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. पण सोमवारी रात्री अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला..
सोमवारी रात्री 12 वाजता दिनेश फडणीस याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्यावर मंगळवारी 5 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार ‘सीआयडी’ शोची संपूर्ण टीम आताच्या घडीला दिनेश याच्या निवासस्थानी आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिनेश फडणीस याच्या निधनाची चर्चा रगंली आहे. चाहते आणि अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. दिनेश फडणीस याने त्याच्या विनोदबुद्धीने चाहत्यांना पोट धरुन हासायला लावलं.. पण आता तोच अभिनेता कुटुंब आणि चाहत्यांना रडवून त्याच्या पुढच्या मार्गाला गेला आहे.
दिनेश फडणीस याने अनेक मालिका, शो, सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण दिनेश याला ‘सीआयडी’ मध्ये फ्रेड्रिक्स ही भूमिका साकारल्यानंतर लोकप्रियता मिळाली. ‘सीआयडी’ शो आता प्रसारित होत नसला तरी, शोमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
दिनेश फडणीस याला काय झालं होतं?
अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर फ्रेड्रिक्स याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. पण अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला नसून ‘सीआयडी’ मधील दया याने फ्रेड्रिक्स याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली होती. फ्रेड्रिक्स याला हृदयविकाराचा झटका आला नसून अभिनेत्याचं यकृत निकामं (लिव्हर डॅमेज) झाल्याची माहिती दया याने दिली हेती.
दिनेश याने सीआयडी शिवाय, अभिनेता आमिर खान स्टारर ‘सरफरोश’ आणि अभिनेता हृतिक रोशन स्टारर ‘सुपर 30’ सिनेमात देखील काम केलं होतं . एवढंच नाही तर, दिनेश याने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत देखील एक छोटी भूमिका साकारली होती.