‘आम्ही बिश्नोईला खतम करु’, सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
"हे महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही गँग नाही. पूर्ण अंडरवर्ल्ड संपलं आहे. आम्ही बिश्नोईला खतम करु. आरोपी पुन्हा अशी हिंमत करणार नाही अशी कारवाई करु. इथे मुंबई पोलीस आहेत. हा महाराष्ट्र आहे. इथे कुणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाहीत", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या भेटीनंतर दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्री स्वत: सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथील निवासस्थानी गेले. त्यांनी सलमान खानच्या कुटुंबियांना धीर दिला. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असं आश्वासन दिलं. सलमान खान यांच्या घरावर गोळीबार झाल्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. सलमान खान सारख्या इतक्या मोठ्या अभिनेत्याच्या घरावर गोळीबार होऊ शकतो मग सर्वसामान्याचं काय? असा प्रश्न निर्माण होतोय. संबंधित घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं या प्रकरणी 24 तास तपास सुरु आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे बिश्नोई गँगचे असल्याची चर्चा आहे. बिश्नोई गँगकडून याआधीही सलमान खानला अनेकदा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बिश्नोई गँगवर कडाडले. आम्ही बिश्नोई गँगला खतम करु. ही मुंबई आहे, इथे कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असं एकनाथ शिंदे रोखठोकपणे म्हणाले.
“हे महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही गँग नाही. पूर्ण अंडरवर्ल्ड संपलं आहे. आम्ही बिश्नोईला खतम करु. आरोपी पुन्हा अशी हिंमत करणार नाही अशी कारवाई करु. इथे मुंबई पोलीस आहेत. हा महाराष्ट्र आहे. इथे कुणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाहीत. कोणत्याही नागरिकाला जर कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर… खरंतर सलमान खान तर आमचा खूप मोठा फिल्मस्टार आहे. त्याच्या कुटुंबाची जाबाबदारी आमची आहे. अशी कुणाचीही गँग इथे चालणार नाही. त्यांची गँग आम्ही मुंबई महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्यांना पकडलंय त्यांचा तपास सुरु आहे. मूळापर्यंत तपास होईल. जो जो आरोपी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या सुरक्षेचं आमचं काम आहे आणि ते काम आम्ही करणार”, असं एकनाथ शिंद म्हणाले.
‘आरोपींना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी’
“मी सलमान खानची भेट घेऊन इथे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. इथे फायरिंग झालं. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पोलिसांनी काल भुजमधून विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली आहे. ते बिहारचे राहणार आहेत. पोलिसांनी आरोपींची 25 तारखेपर्यंत कोठडी घेतली आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल. अगदी मूळापर्यंत चौकशी केली जाईल. त्यामुळे यामागे कोण आहे? याचा शोध पोलीस घेतील”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘सरकार सलमान खानच्या कुटुंबाच्या पाठिशी’
“मी सलमान खानला भेटलो. त्याला दिलासा दिला. सरकार सलमान खानच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. त्यांच्या सरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. पुन्हा कुणी अशा प्रकारची धाडस होऊ नये याची काळजी सरकार घेईल. मी सलमानला सांगितलं की, पूर्ण सरकार तुमच्या पाठिशी आहे. हा हल्ला झाला तेव्हा तातडीने मी पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आरोपींना कालच अटक केली आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
“पोलीस आरोपीवर कठोर कारवाई करतील. यापुढे अशाप्रकारची हिंमत कुणी करता कामा नये. अशाप्रकारची जरब पोलीस त्यांच्यावर बसवतील. त्याचबरोबर सलमान खानच्या नातेवाईकांना आणि सलमानला पोलीस संरक्षण वाढण्याच्या सूचना मी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.