अतुल परचुरे यांच्या निधनावर मोदींकडून दुःख व्यक्त, पत्र पाठवून परचुरे यांच्या पत्नीचं सांत्वन
Prime Minister Narendra Modi on Atul Parchure death: अतुल परचुरे यांच्या निधनावर मोदींकडून दुःख व्यक्त, मोदींनी परचुरे यांच्या पत्नीला पाठवलेलं पत्र समोर
Atul Parchure: फक्त मराठीच नाही तर, हिंदी विश्वात देखील आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना पोट धरून हासवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं 15 ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या एक्झिटमुळे सिनेविश्व आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर फक्त सिनेविश्वातीलच नाही तर, अनेक राजकीय मंडळींनी देखील दुःख व्यक्त केलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवत अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांचं सांत्वन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेलं पत्र…
अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं. अशा झालेल्या काही नुकसानामुळे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते… असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून अतुल परचुरे यांच्या कामाचं कौतुक केलं. शिवाय मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांच्या अमुल्य योगदानाला कधीही विसरता येणार नाही… असं म्हणत त्यांनी कुटुंबाचं देखील सांत्वन केलं.
अतुल परचुरे यांचं कार्य आणि विचार कायम कुटुंबाला प्रेरणा देत राहिल. या कठीण प्रसंगी कायम त्यांच्यासोबत असलेल्या आठवणी कुटुंबासाठी आधार आहे. त्यांना देखील कुटुंबाची, मित्रांची आणि चाहत्यांची आठवण येत असेल… पण ते कायम आपल्या हृदयात असतील… असं देखील मोदी म्हणाले. शिवाय या कठीण काळात देव त्यांच्या कुटुंबियांनी शक्ती देवो… असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली.
अतुल परचुरे यांचं निधन
अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. पण मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर 15 ऑक्टोबर रोजी वयाच्या 57 व्या वर्षा अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणाऱ्या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या.