12 तासांचं काम 30 मिनिटांत पूर्ण कर; ‘क्रू’च्या शूटिंगदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अन्याय
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सनॉन यांच्या 'क्रू' या चित्रपटात तृप्ती खामकर या मराठमोळ्या अभिनेत्रीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. याविषयीचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सनॉन यांच्या ‘क्रू’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. बॉलिवूडच्या तीन प्रसिद्ध अभिनेत्रींची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सहाय्यक भूमिका साकारली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे तृप्ती खामकर. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तृप्तीने ‘क्रू’साठी शूटिंग करताना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं, याचा खुलासा केला. तिला 12 तासांचं काम फक्त अर्ध्या तासात पूर्ण करायला सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर तिच्या डायलॉग्ससाठी व्यवस्थित स्क्रिप्टसुद्धा देण्यात आली नव्हती. करीना, तब्बू आणि क्रिती हे मुख्य कलाकार त्यांचं शूटिंग संपवून गेल्यानंतर तृप्तीला शूट करण्यास सांगितलं जायचं.
‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही मोठ्या स्टार्ससोबत काम करता, तेव्हा अर्थातच त्यांचं शूटिंग आधी पूर्ण केलं जातं आणि ते सर्वांत आधी घरी जातात. त्यानंतर सहाय्यक भूमिकांचं काम सुरू होतं. असं अनेकदा सेटवर झालं होतं. 12 तासांच्या शिफ्टमध्ये सर्व कॅमेरे त्यांच्यावरच असायचे. मी तिथे बाजूला उभी राहून माझे संवाद पाठ करायची. मुख्य स्टार्स शूटिंग संपवून घरी गेल्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासात माझं शूटिंग व्हायचं. मला असं म्हटलं जायचं की, तृप्ती आज चित्रपटासाठी जेवढं काम झालं, ते अर्ध्या तासात पूर्ण कर. तेसुद्धा मी आव्हान स्वीकारलं आणि म्हटलं की, ठीके, मी पूर्ण करते.”
View this post on Instagram
‘क्रू’ या चित्रपटात काम केल्यानंतर आयुष्यात कोणत्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकतो, असा विश्वास आपल्यात निर्माण झाल्याचं तृप्तीने सांगितलं. “माझ्या मते या सगळ्यातून मी खूप शिकले. माझ्याकडे थिएटरमधील मास्टर्स डिग्री आहे, पण ती शिकवण तुम्हाला खऱ्या आयुष्यात कामी येत नाही. सेटवर तुम्हाला जे शिकायला मिळतं, ते पूर्णपणे वेगळं असतं. संपूर्ण दिवसभर तुम्ही कोणत्या सीनमध्ये आहात याकडे लक्ष ठेवावं लागतं. लोक तुम्हाला तुमचे डायलॉग्स किंवा लाइन्स व्यवस्थितपणे देत नाहीत”, असं ती पुढे म्हणाली.
याविषयी तृप्तीने पुढे सांगितलं, “तुम्ही इतरांना त्यांचे डायलॉग्स म्हणताना बघता आणि त्यानंतर आपले डायलॉग्स कसे म्हटले जावेत, याचा अभ्यास करता. क्रू या चित्रपटात काम केल्यानंतर मला असं वाटतंय की मी कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत काम करू शकते. कारण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला बरंच काही शिकायला मिळालंय.”